मुंबई विमानतळ उद्यापासून प्लास्किटमुक्त होणार

Mumba Airport

 

मुंबई प्रतिनिधी । मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्या म्हणजेच २ ऑक्टोबर पासून १०० टक्के प्लास्टिकमुक्त होणार असल्याची घोषणा जीव्हीकेने सोमवारी केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, उद्या दि. 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीपासून देश प्लास्किटमुक्त करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले होते. त्याच पार्श्वभूमीवर जीव्हीकेने विमानतळ पूर्णपणे प्लास्किटमुक्त करण्याचा निर्णय घेतला असून देशभरातील 129 विमानतळ प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्णय भारतीय विमानतळ प्राधिकरणाने घेतला होता. त्यापैकी 35 विमानतळांवर या निर्णयाची अंमलबजावणी झाली. उद्यापासून मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्लास्किटमुक्त होणार आहे. यात थर्माकोलपासून बनवलेली डिस्पोजेबल कटलरी (पॉलिस्टीरीन किंवा प्लास्टिक) पेट बॉटल्स (२०० एमएलपेक्षा कमी), प्लास्टिक बॅग (हँडल शिवाय आणि हँडल असलेल्या), स्ट्रॉ, थर्मोकोल आयटम्स आणि बबल रॅपचा समावेश आहे.’ अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवक्त्यांनी दिली. याऐवजी जीव्हीके लाउंजमध्ये स्टीलचे स्ट्रॉ, कटलरी आणि अन्य बायोडिग्रेडेबल मटेरिअलच्या वस्तू, कापडी पिशव्या वापरल्या जाणार आहेत.

दरम्यान, पालिकेनेही नागरिकांना प्लास्किटमुक्तीचे आवाहन केले असून नियमभंग करणाऱ्यांवर पाच हजार रुपयांपासून १० हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची कारवाई किंवा तीन महिने कैद आणि २५ हजारपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. ‘सर्व नागरिकांना सिंगल यूज प्लास्टिक जवळच्या संकलन केंद्रात जमा करायचे आहे,’ असे मुंबई महानगरपालिकेने जाहीर केले आहे.

Protected Content