बेस्ट कर्मचार्‍यांचा संप सुरूच राहणार

मुंबई प्रतिनिधी । शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि महापौर महाडेश्‍वर यांच्यासोबतची बैठक निष्फळ ठरल्यामुळे बेस्ट कर्मचार्‍यांचा संप सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

संपावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी सकाळी बेस्टच्या महाव्यवस्थापकांबरोबर कामगार नेत्यांची बैठक पार पडली. मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यानंतर महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी गुरुवारी सायंकाळी बेस्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांना महापौर बंगल्यामध्ये चर्चेसाठी पाचारण केले. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पालिका आयुक्त अजोय मेहता, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे आदी उपस्थित होते. यात संपावर तोडगा निघण्याची शक्यता होती. तथापि, असे झाले नाही. या बैठकीमध्ये महापालिकेतील विलिनीकरणाच्या प्रस्तावाला सपशेल नकार देण्यात आला. कामगारांचे पे ग्रेडबाबत पैसे नसल्याचे कारण देत लेखी आश्‍वासनही दिले नाही. यामुळे आता बेस्ट कर्मचार्‍यांचा संप कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बेस्ट कर्मचार्‍यांचा आज मेळावा होणार असून यात संपाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.

दरम्यान, बेस्ट कर्मचार्‍यांच्या संपावर तातडीने तोडगा काढावा अन्यथा शनिवारपासून पालिकेचे सफाई, मलनिस्सारण, रुग्णालय व अन्य विभागांतील कर्मचारीही आंदोलनात उतरतील, असा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियनने दिला आहे. यामुळे मुंबईकरांच्या अडचणीत भर पडणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

Add Comment

Protected Content