आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या पत्नीच्या हस्ते होणार साहित्य संमेलनाचे उदघाटन !

यवतमाळ प्रतिनिधी । येथे आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनाचे उदघाटन आता आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या पत्नीच्या हस्ते करण्यात येणार आहे.

९२ वे अखील भारतीय साहित्य संमेलन वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. या संमेलनाच्या उदघाटनासाठी विख्यात इंग्रजी लेखीका नयनतारा सहगल येणार होत्या. मात्र त्यांना दिलेल्या निमंत्रणावरून वाद सुरू झाल्यामुळे त्यांना बोलावण्याचे टाळण्यात आले होते. यानंतर संमेलनाचे उदघाटन नेमके कोण करणार याबाबत उत्सुकता लागली होती. या अनुषंगाने महामंडळाच्या उपाध्यक्षा विद्या देवधर यांनी गुरुवारी यवतमाळात आयोजित पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली. आयोजकांनी राजुर कळंब येथील आत्महत्या केलेले शेतकरी सुधाकर येडे यांच्या पत्नी वैशाली यांचे नाव उद्घाटक म्हणून सुचविले. महामंडळाने तत्काळ या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती देवधर यांनी दिली. वैशाली येडे यांना दोन मुले असून त्यांच्याकडे तीन एकर शेती आहे. शिवाय त्या अंगणवाडीत मदतनीस म्हणूनही कार्य करीत आहेत.

दरम्यान, शुक्रवारी दुपारी ४ वाजता पोस्टल ग्राऊंड, समता मैदान येथे साहित्य संमेलनाचे उदघाटन होणार आहे. संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे, राज्याचे मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, स्वागताध्यक्ष मदन येरावार यांच्या प्रमुख उपस्थितीत वैशाली येडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला येणार होते. परंतु ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाला. दुसर्‍या दिवशी ते संमेलनाला भेट देण्याची शक्यता आहे.

Add Comment

Protected Content