मनसुख हिरेन हत्याकांड : डायटम रिपोर्ट पॉझिटिव्ह कसा? आता डॉक्टर एनआयएच्या रडारवर

मुंबई : वृत्तसंस्था ।  मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर त्याचा डायटम रिपोर्ट देणारे डॉक्टर एनआयएच्या रडारवर आहेत 

 

मनसुख हिरेन हत्याकांडात माजी पोलीस अधिकारी आणि एन्काऊण्टर स्पेशलिस्ट अशी ओळख असणाऱ्या प्रदीप शर्मा यांना अटक केल्यानंतर नवे वळण लागलं आहे. आतापर्यंत मास्टरमाईंड सचिन वाझेच आहे, असं म्हणणाऱ्या एनआयएने प्रदीप शर्माही मास्टरमाईंड असल्याचं कोर्टात सांगितलंय. त्यामुळे मनसुख हिरेन यांच्या हत्येत कसं षडयंत्र रचलं गेलं याचा तपास केला जातोय.

 

मनसुख हिरेन यांची 4 मार्चला हत्या करून त्यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर खाडीत फेकण्यात आला, जो 5 मार्चला सापडला. मनसुख यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा डायटम रिपोर्ट्स काढण्यासाठी काही सॅम्पल पाठवण्यात आले होते, ज्याचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले. डायटम रिपोर्ट पॉझिटिव्ह आला याचा अर्थ त्या रिपोर्टच्या अनुसार मनसुखचा पाण्यात बुडुन मृत्यू झाला. मात्र एनआयएने या रिपोर्टच्या अगदी उलट दावा केलाय. एनआयएच्या दाव्यानुसार मनसुख हिरेन यांची आधी हत्या करण्यात आली आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह खाडीत फेकण्यात आला. पण तरीही डायटम रिपोर्ट पॉझिटिव्ह कसा आला? याच प्रश्नाच्या आधारे हे डॉक्टर एनआयएच्या रडारवर आहेत.

 

एखाद्या व्यक्तीचा मृतदेह पाण्यात सापडला असेल तर शवविच्छेदनाबरोबरच त्याचा डायटम रिपोर्टही काढला जातो. डायटम रिपोर्ट म्हणजे त्या व्यक्तीचा मृत्यू जर पाण्यात बुडुन झाला असेल तर पाण्यात बुडत असताना श्वासोच्छवास सुरू असल्याने नाकातोंडातून गेलेलं पाणी हे फुफ्फुसात जमा होत आणि ज्या पाण्यात बुडून मृत्यू झाला त्या पाण्यातील नमुने त्याच्या शरीरात सापडतात म्हणजेच डायटम रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो. पण त्याच व्यक्तीचा मृत्यू जर पाण्याबाहेर झाला असेल आणि नंतर मृतदेह पाण्यात फेकला असेल तर शरीरात पाणी जाण्याची शक्यता धूसर असते. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते ही टेस्ट निगेटिव्ह येते.

 

एनआयएच्या दाव्यानुसार मनसुख यांची टवेरा गाडीत आधी हत्या करण्यात आली आणि त्यानंतर आरोपींनी त्यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर खाडीत फेकून दिला. त्यामुळे मनसुख यांचा डायटम रिपोर्ट निगेटिव्ह येणं गरजेचं होतं. मात्र तरीही तो पॉझिटिव्ह दाखवण्यात आला. यामागे सध्या तीन डॉक्टर रडारवर आहेत. एनआयएला असाही संशय आहे की, मनसुख यांच्या शवविच्छेदन अहवालासोबतही छेडछाड करण्यात आलीय. त्यामुळे शवविच्छेदन सुरू असताना 5 मार्चला ठाण्याच्या त्या रुग्णालयात कोण कोण उपस्थित होत त्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

 

अँटिलिया स्फोटके प्रकरणात आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आतापर्यंत एकूण 10 जणांना अटक करण्यात आलीय. यातले 5 आरोपी मुंबई पोलीस दलात काम केलेले आहेत. मात्र शर्मा आणि वाझे हेच या सगळ्याचे सूत्रधार आहेत असं एनआयएकडून सांगण्यात येतंय. त्यामुळे या आरोपींची साखळी अजून कुठवर जाते हे पाहणे महत्वाचे आहे

 

Protected Content