राष्ट्रवादीचे आमदार बरोरा यांनी बांधले शिवबंधन

barora

मुंबई प्रतिनिधी । ठाणे येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. दादर येथील शिवसेना भवनात जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधले.

याबाबत माहिती अशी की, बरोरा यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्षांकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून बरोरा शहापूर मतदारसंघाचे उमेदवार असतील, हे जवळपास निश्चित झाले आहे. ठाणे जिल्ह्यात जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर पांडुरंग बरोरा यांच्याकडे राष्ट्रवादी नेते म्हणून पाहिले जात आहे. कारण, 1980 पासून बरोरा कुटुंब राष्ट्रवादीचे सर्वेसर्व खासदार शरद पवार यांच्याशी स्नेहसंबंध जोडून होते. मात्र, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादची होत असलेली पिछेहाट आणि शिवसेना-भाजपा नेत्यांचं वाढतं प्रस्थ लक्षात घेऊनच बरोरा यांनी शिवबंधन हाती बांधल्याची चर्चा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही बरोरा यांचे पक्षात स्वागत केले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, आगामी तीन ते 4 महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आमदारांकडूनही पक्षबदलीच्या हालचाली सुरू आहेत. यावेळी, आदित्य ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, यांसह शिवसेना आणि बरोरा यांचे कार्यकर्तेही उपस्थित होते.

Protected Content