फ्लिपकार्ट आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात सांमजस्य करार

 

 

मुंबई  वृत्तसंस्था। फ्लिपकार्ट या भारतातील अंतरदेशीय ई-कॉमर्स बाजारपेठेने महाराष्ट्र  लघुउद्योग विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ     यांच्याशी सामंजस्य करार करून राज्यातील स्थानिक कारागीर, विणकर, हस्तकलाकार आणि एमएसएमईना ई-कॉमर्सच्या विश्वात आणले आहे.

 

फ्लिपकार्ट समर्थ या कंपनीच्या प्रमुख उपक्रमात स्थानिक कारागीर आणि त्यांच्या उपक्रमांचा समावेश करण्यासाठीच्या या सामंजस्य करारावर  उद्योगमंत्री सुभाष देसाई,  उद्योग राज्यमंत्री  अदिती तटकरे  यांच्या उपस्थितीत सह्या करण्यात आल्या.

 

या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्रातील स्थानिक कारागीर, विणकर, हस्तकलाकार आणि छोट्या उद्योगांना खादी, पैठणी साड्या, लाकडाची खेळणी, हाताने बनवलेल्या वस्तू, दागिने, कागदी वस्तू, पर्स आणि हस्तकलेच्या इतर वैशिष्ट्यपूर्ण वस्तू देशातील लाखो ग्राहकांसमोर मांडता येतील. यातून सरकारच्या “Vocal for Local” या उद्देशालाही बळकटी मिळणार आहे. फ्लिपकार्ट समर्थ हा राष्ट्रीय पातळीवरील उपक्रम आहे. कुशल स्थानिक कारागीर समुदायाला फ्लिपकार्ट मार्केटप्लेसवर परिणामकारक, पारदर्शक आणि योग्य मूल्यासहित व्यवसायास बळकटी आणण्यासाठी या उपक्रमातून साह्य केले जाईल.

 

सुरुवात करण्यासाठी योग्य वेळेतील पाठबळ देत हा उपक्रम स्थानिक कारागीरांपुढील सुरुवातीच्या टप्प्यातील अडथळे दूर करतो. यात सहजपणे ऑनबोर्डिंग, मोफत कॅटलॉग तयार करणे, विपणन, अकाऊंट व्यवस्थापन, व्यवसायासंबंधी माहिती आणि गोदामाची सुविधा अशा लाभांचा समावेश आहे. यामुळे समाजातील या अत्यंत महत्त्वाच्या समुदायासाठी व्यवसायवृद्धी आणि उद्योग समावेशकतेच्या संधी निर्माण होतात.

 

स्थानिक कारागीर आणि हस्तकला कारागीरांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्यातील उद्योग समावेशकता वाढवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकार राज्य पातळीवर अनेक उपक्रम राबवत आहे. राज्य सरकारने एमएसएसआयडीसी आणि एमएसकेव्हीआयबीची स्थापना करून महाराष्ट्रातील लघु उद्योगांना विकासासाठी नवे बळ आणि दृष्टिकोन दिलेला आहे.

 

उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, “राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात आणि राज्याच्या सामाजिक-आर्थिक विकासात एसएसएमई क्षेत्राचा मोठा वाटा आहे. कोविड-१९ नंतरच्या काळात आम्ही हस्तकला आणि हातमाग उद्योगाला सक्षम करण्यासाठी आणि त्यांना अधिक चांगल्या बाजारपेठेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी या  सामंजस्य कराराद्वारे पावले उचललेली आहेत.”

 

. राज्यमंत्री अदिती तटकरे  म्हणाल्या, “सामंजस्य करारामुळे खादी आणि ग्रामोद्योग, हस्तकला आणि हातमाग उद्योग क्षेत्राच्या वाढीला चालना मिळेल आणि त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण होतील.”

 

फ्लिपकार्ट समूहाचे चीफ कॉर्पोरेट अफेअर्स ऑफिसर रजनीश कुमार म्हणाले, “एमएसएसआयडीसी आणि एमएसकेव्हीआयबीसोबत भागीदारी करून स्थानिक कारागीर, विणकर आणि लघु उद्योगांचा सामाजिक आणि व्यावसायिक विकास साधत या व्यासपीठावर राज्याचा संपन्न वारसा मांडण्याची ही संधी मिळाल्याबद्दल आम्ही उत्सुक आहोत. आमच्या व्यासपीठावर खरेदी करणाऱ्या ३०० दशलक्ष ग्राहकांची राष्ट्रीय बाजारपेठ देशभरातील एमएसएमईना उपलब्ध करून देण्यात ई-कॉमर्स फार महत्त्वाची भूमिका बजावते. फ्लिपकार्ट समर्थ हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. यात व्यवसायांना आवश्यक पाठबळ मिळते आणि अशा अधिकाधिक स्थानिक व्यवसायांना ई-कामॅर्सचे लाभ मिळवून देण्यासाठी त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू अशी आम्हाला आशा आहे.”

 

उद्योग खात्याचे प्रधान सचिव बलदेव सिंह म्हणाले, “आपल्या हस्तकला व्यावसायांना व  कारागिरांना मौल्यवान, व्यावसायिक ज्ञान मिळेल आणि त्यांची वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने भारतभरात पोहोचतील, अशी आशा या  सामंजस्य कराराद्वारे  आहे.”

 

राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. नीलिमा केरकेटा म्हणाल्या, “ग्रामोद्योग क्षेत्रातील उत्पादनांच्या विपणनासाठी हे व्यासपीठ परिणामकारक  आहे.   ग्रामीण लघु उद्योजकांना  आधुनिक पद्धतीने रोजगार मिळवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.”

 

लघुउद्योग विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक प्रविण दराडे म्हणाले, “या उपक्रमातून स्थानिक कारागीरांना सुरुवातीच्या टप्प्यात जाणवणाऱ्या अडचणी दूर होतील आणि यातून दीर्घकालीन रोजगार मिळेलच. त्यासोबतच कारागीरांना   पिढयानुपिढया  असलेली स्थानिक कला आणि कारागीरीची कौशल्ये  नव्या पिढीपर्यंत पोहोचवता येतील.”

 

 

फ्लिपकार्ट समर्थ  ग्राहकांसाठी या व्यासपीठावर मराठी इंटरफेस उपलब्ध असल्याने राज्यातील ग्राहकांच्या अधिक निकट पोहोचता येणार आहे.

Protected Content