Home राजकीय दिल्लीनंतर पुण्यात होणार ‘कॉकरोच जनता पार्टी’चे आंदोलन

दिल्लीनंतर पुण्यात होणार ‘कॉकरोच जनता पार्टी’चे आंदोलन

0
12


पुणे-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या चर्चित आंदोलनानंतर आता ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) महाराष्ट्रात आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी 11 जून रोजी पुण्यात मोठ्या आंदोलनाची घोषणा केली असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येणार आहे. दिल्लीतील आंदोलनाला मिळालेल्या प्रतिसादानंतर पुणे हे या मोहिमेचे पुढील केंद्र बनले आहे.

कॉकरोच जनता पार्टीच्या मते, देशातील स्पर्धा परीक्षा, भरती प्रक्रिया आणि शैक्षणिक व्यवस्थेतील कथित अनियमिततेमुळे लाखो विद्यार्थी व युवक त्रस्त आहेत. नीट परीक्षा, सीबीएसई निकालांशी संबंधित वाद तसेच विविध भरती प्रक्रियांमधील कथित त्रुटींमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी वाढत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनातून करण्यात येणार आहे.

याआधी 6 जून रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात आले होते. दिल्ली पोलिसांच्या परवानगीनंतर झालेल्या या आंदोलनात शेकडो विद्यार्थी, युवक आणि पालक सहभागी झाले होते. अनेक आंदोलकांनी कॉकरोचचे मुखवटे परिधान करून निषेध नोंदवला होता. शांततापूर्ण पद्धतीने पार पडलेल्या या आंदोलनानंतर शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली होती.

गेल्या काही आठवड्यांत सोशल मीडियावर वेगाने लोकप्रिय झालेल्या या चळवळीची सुरुवात व्यंगात्मक स्वरूपात झाली असल्याचे सांगितले जाते. काही वादग्रस्त वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ची संकल्पना मांडली. बेरोजगारी, शिक्षणातील समस्या आणि युवकांच्या वाढत्या असंतोषाला आवाज देण्याचा प्रयत्न म्हणून ही चळवळ उभी राहिल्याचा दावा केला जात आहे. अल्पावधीतच या मोहिमेला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 जून रोजी पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात आंदोलन करण्यात येणार आहे. दिल्लीतील आंदोलनानंतर महाराष्ट्रातील हे पहिले मोठे शक्तिप्रदर्शन मानले जात असून विद्यार्थी संघटना आणि युवकांचा सहभाग वाढवण्यावर विशेष भर दिला जात आहे.

सुरुवातीला सोशल मीडियापुरती मर्यादित वाटणारी ही चळवळ आता राष्ट्रीय चर्चेचा विषय ठरत आहे. युवकांमधील नाराजीचे प्रतीक म्हणून कॉकरोच जनता पार्टीकडे पाहिले जात असल्याचे काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्यामुळे पुण्यातील आंदोलनाकडे केवळ विद्यार्थीच नव्हे तर राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.

कॉकरोच जनता पार्टी हा औपचारिक राजकीय पक्ष नसला तरी बेरोजगारी, परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता आणि शैक्षणिक सुधारणांच्या मुद्द्यांवर सुरू असलेल्या त्यांच्या आंदोलनांमुळे युवकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 11 जून रोजी पुण्यात होणाऱ्या आंदोलनाला किती प्रतिसाद मिळतो आणि त्याचे राजकीय पडसाद किती दूरवर उमटतात, याकडे आता राज्यभरातील विद्यार्थ्यांचे आणि राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound