


चोपडा/सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील वेले–चहार्डी परिसरात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव विधानपरिषद मतदारसंघाचे आमदार नंदकिशोर भागवत महाजन यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला आणि पात्र शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी आमदार महाजन यांनी वेले–चहार्डी परिसराचा दौरा केला. यावेळी महिला शेतकरी शितलताई अरुण पाटील यांच्या शेतातील कापूस पिकाची, तसेच सोपान बाळू पाटील यांच्या शेतातील मका पिकाची त्यांनी पाहणी केली. पिकांची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेत त्यांनी शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली. पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान, शेतीसमोरील अडचणी आणि शासनाकडून अपेक्षित मदतीबाबत आमदार महाजन यांच्याशी चर्चा केली. नुकसानग्रस्त कोणताही पात्र शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. यावेळी आमदार महाजन यांनी तहसीलदार भाऊसाहेब थोरात आणि कृषी अधिकारी श्री. साळुंखे यांना नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक शेतकऱ्याच्या नुकसानीची अचूक नोंद करून पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ वेळेत मिळेल, यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात सरकार त्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधून सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही आमदार नंदकिशोर महाजन यांनी दिली. यावेळी भाजपा जळगाव पूर्वचे सरचिटणीस राकेश पाटील, मंडळ अध्यक्ष कांतिलाल पाटील, पिंटू पावरा, स्थानिक शेतकरी सुरेश पाटील, छबिलदास पाटील, गणेश पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.



