Home प्रशासन रावेर भूमी अभिलेख कार्यालयातील दोन भूकरमापक निलंबित 

रावेर भूमी अभिलेख कार्यालयातील दोन भूकरमापक निलंबित 

0
5


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरातील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील दोन भूकरमापकांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांची कामे प्रलंबित ठेवणे, विविध कामांसाठी त्यांना वारंवार कार्यालयात बोलावणे आणि कामकाजात दिरंगाई केल्याच्या तक्रारींची चौकशी झाल्यानंतर उपसंचालक, भूमी अभिलेख, नाशिक यांनी ही कारवाई केली. अमोल उत्तमराव पालवे आणि धनराज अशोक लहरिया अशी निलंबित भूकरमापकांची नावे आहेत.

रावेर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कामकाजाबाबत नागरिकांकडून तक्रारी करण्यात येत होत्या. संबंधित भूकरमापकांकडून विविध कामांसाठी नागरिकांना वारंवार कार्यालयात बोलावले जात असल्याचे तसेच कामकाजात दिरंगाई होत असल्याचे नागरिकांनी आमदार अमोल जावळे यांच्या निदर्शनास आणून दिले होते.नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत आमदार अमोल जावळे यांनी या प्रकरणाची तक्रार उपसंचालक, भूमी अभिलेख, नाशिक यांच्याकडे केली. त्यानंतर संबंधित विभागाने या प्रकरणाची चौकशी केली. चौकशीअंती अमोल पालवे आणि धनराज लहरिया या दोन्ही भूकरमापकांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर दोन्ही भूकरमापकांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे रावेरच्या भूमी अभिलेख कार्यालयात खळबळ उडाली आहे. नागरिकांची कामे प्रलंबित राहणे आणि त्यांना वारंवार कार्यालयात हेलपाटे मारावे लागणे या तक्रारींची विभागीय पातळीवर दखल घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, दोन्ही भूकरमापकांच्या निलंबनाची माहिती रावेर शहरात पसरल्यानंतर नागरिकांमध्ये या कारवाईची चर्चा सुरू झाली. काही नागरिकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. तसेच तक्रारीची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी पाठपुरावा केल्याबद्दल आमदार अमोल जावळे यांचे नागरिकांनी आभार मानले. या कारवाईनंतर शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची कामे वेळेत आणि नियमानुसार पूर्ण व्हावीत, नागरिकांना अनावश्यक हेलपाटे मारावे लागू नयेत आणि तक्रारींची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound