Home Cities बुलढाणा पंचनामे नको, शेतकऱ्यांना थेट १०० टक्के भरपाई द्या  – रविकांत तुपकर

पंचनामे नको, शेतकऱ्यांना थेट १०० टक्के भरपाई द्या  – रविकांत तुपकर

0
9


बुलढाणा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून आता नुकसानीचे पंचनामे करण्यात वेळ घालवण्याची गरज नाही. शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा पंचनामा न करता त्यांना तातडीने शंभर टक्के भरपाई देण्यात यावी, अशी आक्रमक मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. राज्यात सुरू असलेल्या मोठ्या प्रकल्पांना तात्पुरती स्थगिती देऊन त्यासाठीचा पैसा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात वळवावा, अशी मागणीही त्यांनी केली.

बुलढाणा येथे आयोजित राज्यस्तरीय हल्लाबोल आंदोलनादरम्यान रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला इशारा दिला. राज्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने पंचनाम्यांच्या प्रक्रियेत वेळ न घालवता थेट आर्थिक मदत देण्याचा निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. “शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे करण्याची गरजच काय? शेतकऱ्यांना शंभर टक्के भरपाई तातडीने द्या,” अशी मागणी तुपकर यांनी केली. राज्यात शंभर टक्के दुष्काळी परिस्थिती असल्याचा दावा करत सरकारने शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात सध्या सुरू असलेल्या मोठ्या प्रकल्पांनाही स्थगिती देण्याची मागणी तुपकर यांनी केली. शेतकरी संकटात असताना मोठ्या प्रकल्पांवर होणारा खर्च काही काळ थांबवून उपलब्ध निधी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरावा. हा पैसा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्यास संकटाच्या काळात त्यांना मोठा आर्थिक आधार मिळू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत केवळ घोषणा करून चालणार नाही, तर प्रत्यक्ष आर्थिक मदत तातडीने त्यांच्या खात्यात पोहोचणे आवश्यक असल्याची भूमिका तुपकर यांनी मांडली. शेतकऱ्यांना मदतीसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागू नये आणि प्रशासकीय प्रक्रियेत मदत अडकू नये, यासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी तुपकर यांनी आगामी काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आणखी मोठे आंदोलन उभारण्याचे संकेतही दिले. शेतकऱ्यांना योग्य मदत मिळाली नाही आणि त्यांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले, तर लवकरच व्यापक आंदोलनाची घोषणा केली जाईल, असा इशारा त्यांनी सरकारला दिला. त्यामुळे बुलढाण्यातील राज्यस्तरीय हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून तुपकर यांनी शेतकरी नुकसानभरपाईचा मुद्दा आक्रमकपणे पुढे आणला आहे.


Protected Content

Play sound