फैजपुरात कोरोनाच्या चिंतेत चोरट्यांचा धुमाकुळ

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । सध्या कोरोनामुळे जनतेच्या मनात धास्ती असतांनाच शहरात आज चोरट्यांनी खंडेराव देवस्थानाची दानपेटी लांबवत एक एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

शहरातील यावल रोडवरील जे टी महाजन अभियांत्रिकी महाविद्यालय जवळील युनियन बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे खंडोबा देवस्थानातील दानपेटीत चोरट्यांनी लांबविली. युनियन बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी दि. ६ रोजी सायंकाळी ६ वाजे पूर्वी फोडण्याचा प्रयत्न केला तो अयशस्वी ठरला मात्र चोरट्यांनी एटीएम चे तसेच त्यात त्यातील सीसीटीव्ही कॅमेरे चे नुकसान केले. या घटनेप्रकरणी बँकेचे कर्मचारी प्रेरणा सिंग यांनी पोलिसात तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान माहिती मिळताच सपोनि राहुल वाघ फौजदार रोहिदास ठोंबरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपास फौजदार ठोंबरे करीत आहे
तर दुसरीकडे खंडोबा देवस्थान मधील महादेव मंदिरातील दानपेटी व पाण्याची मोटार अज्ञात चोरट्यांनी लांबविली. ही घटना ३० मे रोजी घडली देवस्थानचे मठाधिपती महामंडलेश्‍वर पुरुषोत्तम दास महाराज हे मध्य प्रदेशात असल्याने त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतर दिनांक ६ रोजी मंदिरातील सेवेकरी पवन कुमार यादव यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार दानपेटीतील चार हजार रुपये व दोन हजार किमतीची पाण्याची मोटर असा एकूण सहा हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे तपास हेड कॉन्स्टेबल इक्बाल सय्यद करीत आहेत.

Protected Content