Home उद्योग अवघ्या ४८ तासांत मागणी पूर्ण! यावल-पुणे रातराणी बससेवा सुरू ; वर्षाताई चोपडे...

अवघ्या ४८ तासांत मागणी पूर्ण! यावल-पुणे रातराणी बससेवा सुरू ; वर्षाताई चोपडे यांच्या पाठपुराव्याला यश

0
1

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर यावल शहर व परिसरातील प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) यांच्या यावल नगरपालिकेतील गटनेत्या वर्षा निरज (आकाश) चोपडे यांनी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. त्यांनी १ नोव्हेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे यावल-पुणे आणि पुणे-यावल मार्गावर जादा बसफेऱ्या तसेच रातराणी बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती. एसटी महामंडळाने अवघ्या दोन दिवसांत या मागणीची दखल घेत ३ नोव्हेंबर रोजी बससेवा सुरू केल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

दिवाळीच्या काळात पुणे येथे नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणानिमित्त वास्तव्यास असलेले यावल शहर व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने आपल्या गावी ये-जा करतात. त्यामुळे या काळात बसगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढते. विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदार वर्गाला प्रवासासाठी पुरेशा बस उपलब्ध होत नसल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन वर्षाताई चोपडे यांनी यावल आगार व्यवस्थापकांकडे लेखी निवेदन सादर केले होते. या मागणीला महायुतीच्या नगरसेवकांनीही पाठिंबा दिला. भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्या नंदाताई महाजन, नगरसेविका सविताताई नन्नवरे, कल्पना वाणी, शुभांगी येवले, उमेश भेगडे, बाळू फेगडे, कादिर खान, इरफान लाल आणि रुबाब तडवी यांनी प्रवाशांच्या हितासाठी एकजूट दाखवत प्रशासनाकडे जादा बससेवा सुरू करण्याची मागणी केली.

यावल आगार व्यवस्थापक इम्रान पठाण यांनी निवेदनाची तातडीने दखल घेत सकारात्मक कार्यवाही केली. अवघ्या ४८ तासांत मागणी पूर्ण झाल्यामुळे दिवाळीच्या काळात प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे. रातराणी बससेवा सुरू झाल्याने रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयाबद्दल वर्षाताई चोपडे यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यावल आगार व्यवस्थापकांसह संबंधित प्रशासनाचे आभार मानले. जनतेच्या प्रश्नांसाठी पक्षीय समन्वयातून महायुतीच्या नगरसेवकांनी केलेले सहकार्य हे लोकहिताच्या कार्याचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.


Protected Content

Play sound