महात्मा फुले जनआरोग्य योजनेची सुविधा असणार्‍या हॉस्पीटलमध्ये सिव्हील सारखे होणार उपचार

जळगाव प्रतिनिधी । महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत सुविधा असणार्‍या जिल्ह्यातील ३३ हॉस्पीटल्समध्ये जिल्हा सामान्य रूग्णालयाप्रमाणे उपचार होणार असल्याचे महत्वाचे आदेश आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जारी केले आहेत.

सध्या कोरोनाच्या आपत्तीच्या काळात अलीकडेच जळगावातील गोल्ड सिटी हॉस्पीटल आणि यानंतर आज डॉ. उल्हास पाटील मेडिकलचे रूग्णालय हे डेडीकेटेड कोविड रूग्णालय म्हणून अधिग्रहीत करण्यात आले आहेत. तत्पूर्वी सिव्हील हॉस्पीटलमधील कोविड-१९ पॉझिटीव्ह रूग्णांना या दोन्ही रूग्णालयात शिफ्ट करण्यासाठी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. यामुळे या कालवधीत सिव्हील हॉस्पीटलची सेवा नेमकी कुठे मिळणार याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्मित झाले होते. या पार्श्‍वभूमिवर, आज सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. यात म्हटले आहे की, राज्य शासनाने आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत सर्व व्याधींवर मोफत उपचार उपलब्ध केले आहेत. जिल्ह्यातील ३३ हॉस्पीटल्समध्ये सध्या या योजनेच्या अंतर्गत उपचार होत आहेत. यामुळे जिल्ह्यातील या ३३ हॉस्पीटल्समध्ये जिल्हा सामान्य रूग्णालयाप्रमाणेच मोफत उपचार करण्यात येणार असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

जिल्हा सामान्य रूग्णालय आणि डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील दर्शनी भागात जिल्ह्यात महात्मा फुले जनआरोग्य योजना उपलब्ध असणार्‍या हॉस्पीटल्सची यादी त्यांच्या पत्त्यांसह लावावी असे निर्देश देखील या पत्रात देण्यात आले आहेत.

या रूग्णालयांमध्ये होणार उपचार

जिल्ह्यातील ३३ रूग्णालयांमध्ये महात्मा गांधी जनआरोग्य योजना सुरू असून यात आता सर्व विकारांवर मोफत उपचार होणार आहेत. यामध्ये जळगावातील ऑर्किड हॉस्पिटल, संजीवन हार्ट हॉस्पिटल, प्रकाश चिल्ड्रेन हॉस्पिटल, कांताई नेत्रालय, डॉ. भंगाळे सर्जिकल अँड नर्सिंग होम, श्री शैलेजा अ‍ॅक्सिटेंड हॉस्पिटल, जावळे हॉस्पिटल, अश्‍विनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, डॉ. महाजन हॉस्पिटल, डॉ. खडके हॉस्पिटल, गायत्री हॉस्पिटल, जीवनज्योती कॅन्सर हॉस्पिटल; भुसावळातील पुष्पा सर्जिकल हॉस्पिटल, डॉ. भिरूड हॉस्पिटल, साईपुष्प अ‍ॅक्सिटेंड हॉस्पिटल आणि विश्‍वनाथ हॉस्पिटला जामनेरातील कमल हॉस्पिटल व जीएम हेल्थ केअर हॉस्पिटल; चोपडा येथील नृसिंह हॉस्पिटल; पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल, चाळीसगावचे बापजी जीवनदीप हॉस्पिटल, सौ. शैलेजा मेमोरियल कृष्णा केअर सेंटर; अमळनेर येथील श्री अ‍ॅक्सिटेंड हॉस्पिटल तर वरणगाव येथील धन्वंतरी हॉस्पिटल यांचा समावेश आहे.

याशिवाय जळगावातील शाहू महाराजासह रुग्णालय, मुक्ताईनगर,जामनेर, चोपडा, पहूर ग्रामीण रुग्णालयात मोफत उपचार होणार आहेत.

Protected Content