पॉर्न कंटेटमुळे ट्विटरला महिला आयोगाची नोटीस

 

नवी दिल्ली : वृत्तसंथा ।  राष्ट्रीय महिला आयोगाने ट्विटरकडे एका आठवड्याच्या आत सर्व प्रकारचा अश्लिल मजकूर काढून टाकण्याची मागणी केली आहे.

 

महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी  चौकशी करण्याचे आणि योग्य ती कारवाई करण्याची मागणी करणारं पत्र दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना लिहिलं आहे.

 

महिला आयोगाच्या एका पॅनलने सांगितलं की, महिला आयोगाला ट्विटरवर अश्लिल मजकूर पोस्ट करणारे काही हँडल्स आढळून आले आहेत. त्यामुळे अशा प्रकारचा सर्व अश्लिल मजकूर, फोटो, व्हिडिओ, सर्वकाही एका आठवड्याच्या आत हटवावा असा इशारा महिला आयोगाने ट्विटरला दिला आहे.

 

आयोगाने सांगितलं की, आधीही अशा प्रकारच्या तक्रारी आल्यानंतर आयोगाने तात्काळ कारवाई करण्याची मागणी ट्विटरकडे केली होती. भारतीय कायद्यांचं उल्लंघन करणारा, तसंच ट्विटरच्या नियमावलीचा भंग करणारा हा मजकूर ट्विटरवर उपलब्ध आहे हे माहित असूनही तो हटवण्यासाठी ट्विटरकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, ही गोष्ट महिला आयोगाला खटकणारी आहे, असंही आयोगाकडून सांगण्यात आलं.

 

अशा प्रकारचा मजकूर पोस्ट करणारे काही हँडल्स आयोगाने ट्विटरच्या निदर्शनास आणून दिले आहेत. अशा प्रकारच्या सर्व पोस्ट एका आठवड्यामध्ये हटवण्यास आयोगाने सांगितलं आहे. तर अशाय हँडल्सवर काय कारवाई झाली याची माहिती ट्विटरने आयोगाला १० दिवसात द्यावी असंही सांगण्यात आलं आहे.

 

याआधी दिल्ली पोलिसांनी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या तक्रारीनंतर ट्विटरविरोधात कारवाई केली होती. दिल्ली पोलिसांनी लहान मुलांचं लैंगिक शोषण आणि अश्लिल साहित्याच्या संदर्भात ट्विटरला नोटीस पाठवली होती. तर यासंदर्भात ट्विटरच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, ट्विटर बालकांच्या शोषणाचं समर्थन करत नाही. ते ट्विटरच्या नियमावलीच्या विरोधात जाऊन ज्या हँडल्सवर अशा पोस्ट्स येत आहेत त्यांची माहिती मिळवून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या प्रयत्नात आहेत. हे प्रकरण सोडवण्यासाठी ट्विटर भारतीय कायदे आणि काही सेवाभावी संस्थांसोबत काम करेल.

 

Protected Content