दानवे खरे सांगत असतील तर चीन , पाकिस्तानवर हल्ला करा

 

मुंबई: वृत्तसंस्था । दिल्लीच्या शेतकरी आंदोलनामागे चीन व पाकिस्तानचा हात असल्या संजय राऊत म्हणाले की ‘रावसाहेब दानवे यांच्यावर आमचा विश्वास आहे. पुरावा असल्याशिवाय ते बोलणार नाहीत. दानवे यांची माहिती गंभीरपणे घेऊन मोदी सरकारनं चीन व पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक करावा,’

सिंघू बॉर्डरवर सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन हे एक षडयंत्र आहे, असं दानवे जालन्यातील एका कार्यक्रमात म्हणाले होते. त्यानंतर बच्चू कडू यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. दानवेंचा डीएनए भारताचा की पाकिस्तानचा हे एकदा तपासावे लागेल, असं कडू म्हणाले होते. त्यानंतर आता शिवसेनेनं दानवे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना केंद्र सरकारला सावध केलं आहे. ‘केंद्र सरकारमधील एक मंत्री अशा पद्धतीचं वक्तव्य करतो, याचा अर्थ त्यांच्याकडं नक्कीच माहिती आहे. दानवेंच्या वक्तव्यावर कॅबिनेटमध्ये नक्कीच चर्चा झाली असेल. पंजाब हे सीमेवरचं राज्य आहे. बाहेरची एखादी शक्ती आपल्या देशात अशांतता पसरवत असेल तर ते गंभीर आहे. एक राष्ट्रभक्त संघटना म्हणून शिवसेना दानवेंचं हे वक्तव्य गंभीरपणे घेते. केंद्र सरकारनंही ही बाब गंभीरपणे घ्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि तिन्ही सेना दलाच्या प्रमुखांनी तातडीनं बैठक घेऊन चीन व पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइकचा निर्णय घेतला पाहिजे,’ असं राऊत म्हणाले.

‘चीनचे सैनिक भलेही आज लडाखमध्ये ठाण मांडून बसले असतील. पण ते सिंघू सीमेवर पोहोचले असतील तर अधिक चिंतेची बाब आहे. त्यामुळं चीन व पाकिस्तानला ताबडतोब धडा शिकवला पाहिजे,’ असा टोलाही त्यांनी केंद्र सरकारला हाणला.

‘आज अवघा देश चिंतेत आहे. लाखो शेतकरी सिंघू बॉर्डरवर आहेत. आंदोलनावर तोडगा काढायचा असता तर कधीच निघाला असता. मात्र, सरकारला हा विषय असाच लोंबकळत ठेवायचा आहे, असं दिसतं. महाराष्ट्र, पंजाब व इतर राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या समस्या जवळपास सारख्याच आहेत. केंद्र सरकारला काही सुधारणा हव्या असतील तर भाजपशासित प्रदेशांतून त्याची सुरुवात करावी. तिकडे काय परिणाम होतो त्याचा अंदाज घेऊन इतर राज्यात या सुधारणा राबवता येतील. कदाचित उद्या पंजाबही त्याचा स्वीकार करेल,’ असंही राऊत म्हणाले.

Protected Content