पाकच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूरचा जवान शहीद

 

कोल्हापूर: वृत्तसंस्था । जम्मूमध्ये झालेल्या पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एक जवान शहीद झाला. करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथील संग्राम शिवाजी पाटील याला शुक्रवारी मध्यरात्री वीरमरण आले. ही बातमी गावात कळताच परिसरात शोककळा पसरली आहे.

ऐन दिवाळीतच पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथील जवान ऋषिकेश जोंधळे यास वीरमरण आले होते. दिवाळी दिवशीच त्याच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी मध्यरात्री कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एक जवान जम्मू मध्ये शहीद झाला.

शाहिद जवान संग्राम पाटील हा सैन्यदलातील ‘१६ मराठा बटालियन’मध्ये कार्यरत होता. अठरा वर्षांपूर्वी सैन्यदलात भरती झालेल्या संग्रामची १७ वर्षाची मुदत गेल्या वर्षी संपली होती. सतरा वर्षे देश सेवा केल्यानंतर आणखी दोन वर्षे त्याने मुदत वाढवून घेतली होती. पण शुक्रवारी पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात त्याला वीरमरण आले.

संग्राम डिसेंबर महिन्यात सुट्टीला गावी येणार होता. त्याने मित्रांना तसे कळवले होते. गावात त्याच्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. वेळोवेळी फोन करून तो घराच्या बांधकामाबाबत चौकशी करत होता, पण नवीन घरात राहण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही.

Protected Content