नाशिक जिल्ह्यातून दुचाकी चोरणाऱ्या वाकोदच्या दोन चोरट्यांना अटक; एलसीबीची कारवाई

जळगाव प्रतिनिधी । नाशिक जिल्ह्यातून दुचाकी चोरुन चोरीच्या दुचाकीवर फिरणाऱ्या जामनेर तालुक्यातील वाकोद येथील दोघांच्या एलसीबीने मुसक्या आवळल्या आहे. दोघांकडून दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहे. किरण मोहन इंगळे वय 32 रा गोसावीवाडी, वाकोद व सागर गणेश उमटे वय 20 रा. वाकोद अशी संशयितांची नावे आहेत.

पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी दुचाकी चोरीच्या घटनांच्या तपासाबाबत स्थानिक गुन्हे शाखेला सुचना व मार्गदर्शन केले आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बापू रोहम यांनी सहाय्यक फौजदार अशोक महाजन, विजय शामराव पाटील, नंदलाल पाटील, सचिन महाजन, दत्तात्रय बडगुजर, भगवान पाटील, प्रकाश महाजन, गफुर तडवी यांच्या पथक नियुक्त केले होते.

एकाच गावातील दोघे, दोघांकडे चोरीची दुचाकी
पथकाला जामनेर तालुक्यातील वाकोद या गावातील दोन जण चोरीची दुचाकी वापरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने वाकोद गाठले. याठिकाणाहून किरण मोहन इंगळे यास ताब्यात घेतले त्याच्याकडून (एम.एच. 17 डी.ए. 2655) ही दुचाकी मिळून आली. तर सागर गणेश उमटे यासही ताब्यात घेतले. त्याच्याकडून (एम.एच. 19 डी.जे.9253) ही दुचाकी हस्तगत केली. पोलिसांच्या तपासात एका दुचाकीबाबत नाशिक जिल्हयातील निफाड तर दुसर्‍या दुचाकीबाबत नाशिक शहरातील आडगाव येथे गुन्हा दाखल आहे. संशयित किरण इंगळे व सागर उमटे या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने नाशिक ग्रामीणअंतर्गत निफाड पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. या दोघांकडून नाशिक शहर तसेच जळगाव जिल्ह्यातील इतरही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Protected Content