धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील उच्चभ्रू वस्तीतील घरात सुरु असलेल्या पत्त्याच्या क्लबवर अक्षयतृतीयेच्या पूर्वसंध्येला टाकलेल्या धाडीत लाखो रुपये गायब झाले होते. तेव्हापासूनच एसडीपीओ कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनीच ‘शाळा’ भरवित ही रोकड लंपास केल्याचे बोलले जात होते. घटनास्थळी साधारण १० ते १५ लाखाची रोकड असताना गुन्ह्यात अवघे पावणे तीन लाख कसे दाखवले गेले? उर्वरित रक्कम कुठे गायब झाली? याची माहिती समोर येत नसल्यामुळे संशयकल्लोळ निर्माण झाला होता. परंतू या धाडीतील पैसे कसे गायब झाले? याची सविस्तर माहिती ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ हाती आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, मध्यरात्री धाड टाकण्यासाठी पोलिसांचे पथक साध्या कपड्यांमध्ये घटनास्थळी पोहचले. आधी गाडीतून दोन कर्मचारी उतरले. त्यांनी घराच्या मुख्य दरवाजाला बाहेरून कडी लावली. त्यानंतर अग्रवाल साहेब गाडीतून बाहेर आले व त्यांच्यासोबत इतर कर्मचारी देखील खाली उतरले. अग्रवाल साहेब दरवाज्याजवळ पोहोचल्यानंतर बाकीच्या कर्मचारींनी घराला जवळपास घेरूनच टाकले. जेणेकरून कुणीही पळून जाऊ नये. तरी देखील मागच्या दरवाजाने चार ते पाच जण पळून जाण्यात यशस्वी झालेत, हा भाग वेगळा. या घरातील तीन खोल्यांमध्ये थंडगार एसीत पत्त्यांचा डाव सुरु होता. शेवटच्या खोलीत सर्वात मोठा गेम सुरु होता.
अग्रवाल साहेबांनी घराची कडी उघडून घरमालकाचे नाव घेऊन विचारले की, तो कुठं आहे. त्यावर एका माजी उपनगरध्यक्षांने तू कोण विचारणार? म्हणताच अग्रवाल साहेबांनी सर्वाना आहे त्या ठिकाणी बसण्याच्या सूचना देत ही पोलिसांची धाड असल्याचे सांगितले. थोडा वेळ तर कुणालाच काही कळत नव्हते. थोडी धांदल उडाली. या घाई गडबडीत अनेकांनी खिशातील पैसे मॅटखाली तर काहींनी जवळच असलेलेल्या कांद्याच्या पोत्याखाली लपवले. दोन-तीन जणांनी आपले मोबाईल व पैसे घरातील पडतीवर फेकून दिले. एकाने संडासमधील खिडकीत पैसे लपवले. पहिल्या-दुसऱ्या हा गोंधळ पहिल्या खोलीत सुरु असतांना शेवटच्या खोलीत शिरलेल्या कर्मचारीने सरळ पत्त्यांच्या ठिकाणी असलेली रोकड उचलत खिशात घालून घेतली आणि सर्वाना पहिल्या खोलीकडे नेले. दुसऱ्या खोलीत देखील मोबाईलमध्ये एक कर्मचारी आरोपींची शुटींग करत असतांना दुसऱ्या एकाने गेममधील पैसे उचलतांना मोठा गेम दाखवून दिला.
थोड्या वेळानंतर पकडलेल्या आरोपीकडून मिळालेली रक्कम आणि ऐवजची मोजणी सुरु झाली. यावेळी अग्रवाल साहेब खोलीतून बाहेर येत जात असल्याचा फायदा घेत येथे पण पैसे गायब करण्याची ‘शाळा’ भरली. त्यामुळे आपल्या समोर सर्व रक्कम मोजली गेली आणि कागदावर लिहिली गेली,असे अग्रवाल साहेबांना वाटणे स्वाभाविक आहे. परंतु खात्यातील अनुभवाचा फायदा घेत पैसे हातोहात गायब केले गेले. यानंतर सर्व आरोपींना एक-एक करून वाहनांनी पोलीस स्थानकात नेण्यात आले. त्यावेळी क्लबमधील एका मुख्य व्यक्तीला काही जणांनी जवळ बोलावून धाडी दरम्यान,आपण कुठे कुठे पैसे लपवले आहेत,त्याची माहिती सांगितली.
दोन-तीन जणांनी सांगितले की, आम्ही मॅटखाली पैसे फेकलेले आहेत. कुणी दहा,कुणी वीस तर कुणी ३५ हजार सांगितले. एकाने सांगितले की, माझे ५० हजारांचे बंडल संडाशीच्या खिडकीत लपवलेले आहेत. एकाने सांगितले की, मी २५ हजार कांद्याच्या पोत्याखाली घातले आहेत. तर दोघांनी सांगितले की, आम्ही अनुक्रमे १४ आणि २० हजार पडतीवर मोबाईल सकट फेकलेले आहेत. त्यामुळे क्लबवरील तो गडी तत्काळ पोलीस स्थानकातून हवेच्या गतीने पुन्हा क्लबवर पोहचला.
क्लबवर मात्र, जे चित्र होते ते अगदी भयंकर होते. धाड टाकायला आलेल्यांपैकी तीन कर्मचारी क्लबमधून बाहेर निघत होते. ते कर्मचारी निघून गेल्यानंतर क्लबवर लपवलेले पैसे शोधण्यासाठी क्लबमध्ये घुसून बघता तर काय, सर्व सामान अस्तव्यस्थ होता.तिन्ही खोलीतील मॅट झटकून झुटकून पाहण्यात आले होते. कांद्याच्या गोण्या पडलेल्या होत्या. पडतीवरील मोबाईल गायब होते. संडाशीच्या खिडकीतील ५० हजाराचे बंडल गायब होते. थोडक्यात येथे देखील पैसे गायब करण्यात आले. दुसरीकडे क्लबवर क्लब मालकाने भाडे काढण्यासाठी दोन पेट्या ठेवल्या होत्या. या पेट्यांमध्ये सकाळपासून काढलेल्या भाड्याची रक्कम होती. दोन्ही पेटींमध्ये फक्त ५०० रुपयांच्याच नोटा होता. त्यानुसार एका पेटीमध्ये साधारण ७० ते ८० हजाराची रोकड होती. परंतू ही रक्कम देखील गायब असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या पेट्यांमधील रक्कम कुठं आहे? असा प्रश्न देखील आता निर्माण झालाय.
थोडा वेळ वरील सर्व हकीगत खोटी असल्याचे जरी गृहीत धरले तरी काही प्रश्नांची उत्तर तरी देखील मिळत नाहीत. त्यात प्रामुख्याने तसं बघायला गेले तर याठिकाणी सर्वच हायप्रोफाईल मंडळी होती. त्यामुळे या ठिकाणी चिल्लर गेम सुरु असणे शक्यच नाही. त्या रात्री ४१ जणांवर केस झाली. एखादं दोन सोडले तर जवळपास सर्वच जण लखपती घरातील होते. त्यामुळे प्रत्येकाकडे किमान ३० हजाराच्यावरच पैसे असतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तर अंदाजे प्रत्येकाकडे किमान ५० हजाराच्या जवळपास रक्कम होती. त्यामुळे ४१ गुणीला ३० हजार जरी पकडले. तरी ती रक्कम १२ लाख ३० हजार होते. मग प्रश्न असा पडतो की, जप्तीची रक्कम पावणे तीन लाखाचं कशी भरली? बाकीचे पैसे कुठं गायब झाले? आणि कोणी केले? तसेच आजच्या घडीला प्रत्येक जण मोबाईल वापरत असतांना माणसं जास्त आणि मोबाईल कमी कसे? असे मोठे प्रश्न निर्माण होत आहेत.
थोडक्यात पाणी कुठं तरी मुरलेय. कर्त्यव्यदक्ष विभागीय अधिकारी सौरभ अग्रवाल यांनी आता या प्रकरणाच्या खोलात शिरणे आता गरजेचे झालेय. कारण साहेब स्वत: घटनास्थळी हजर असतांना देखील कशा पद्धतीने काही कर्मचाऱ्यांनी त्यांच्या डोळ्यात धूळफेक करत पैसे कसे गायब केले? तसेच सर्व आरोपींना पोलीस स्थानकात नेल्यावर तीन कर्मचाऱ्यांनी पुन्हा क्लबवर येत झाडाझडतीतून काही लाख कसे लंपास केले, याची कहाणी एकूणच भयंकर आहे. त्यामुळे डीवायएसपी अग्रवाल यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालत पोलीस दलाची पर्यायी त्यांची प्रामाणिक पोलीस अधिकारी असल्याची प्रतिमा डागाळू पाहणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे.