जिल्हा बँक निवडणूक : सर्वपक्षीय पॅनलची आशा धुसर; भाजपची स्वबळाची तयारी ( व्हिडीओ)

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलसाठी तीनदा बैठका होऊन देखील काहीच निष्कर्ष निघाला नसतांनाच कॉंग्रेसने महाविकास आघाडीची मागणी केली आहे. यामुळे आज भाजपच्या मॅरेथॉन बैठकीनंतर स्वबळाची तयारी करण्याचे ठरविण्यात आले. आ. गिरीश महाजन यांनी याबाबत घोषणा करतांना उद्या सर्व उमेदवार अर्ज भरणार असल्याचे सांगितल्याने आता सर्वपक्षीय पॅनलची शक्यता धुसर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीप्रमाणेच यंदाच्या निवडणुकीतही सर्वपक्षीय पॅनलची निर्मिती करावी असे प्रयत्न जिल्ह्यातील मातब्बर राजकारण्यांनी सुरू केले होते. यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेतला होता. तर पॅनलची जबाबदारी देखील त्यांच्यावरच टाकण्यात आली होती. या अनुषंगाने कोअर समितीची तीन वेळेस बैठक झाली. यात सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले असले तरी कालच्या बैठकीनंतर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी आपल्या पक्षाची भाजप सोबत जाण्याची इच्छा नसून महाविकास आघाडीचे पॅनल तयार करण्यात यावे अशी स्पष्ट भूमिका घेतली. यानंतर आज पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक होईल असे मानले जात असतांना अजिंठा विश्रामगृहात फक्त भाजपचीच बैठक घेण्यात आली. यामध्ये माजी मंत्री आ. गिरीश महाजन, पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे, खासदार रक्षाताई खडसे, खासदार उन्मेषदादा पाटील, आमदार संजय सावकारे आणि आ. मंगेश चव्हाण यांच्यासह पक्षाचे अन्य नेते व पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

दरम्यान, बैठकीनंतर आ. गिरीश महाजन यांनी बैठकीतील निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले की, जिल्ह्याच्या हितासाठी ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भाजपची इच्छा होती. मात्र तीन बैठकांमधून कोणताही निष्कर्ष निघाला नाही. यात कॉंग्रेसने वेगळाच सूर लावला आहे. यामुळे भाजपने स्वबळाची तयारी केली असून उद्या आमचे २१ उमेदवार हे सर्व जागांवर अर्ज भरणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यात दोन्ही खासदारांचा समावेश असेल असे देखील त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सर्वपक्षीय पॅनलची आशा अद्यापही पूर्णपणे मावळली नसली तरी आम्ही स्वबळावर लढण्यासाठी सज्ज असल्याचे आ. गिरीश महाजन यांनी आवर्जून नमूद केले.

खालील व्हिडीओत पहा आ. गिरीशभाऊ महाजन यांची पत्रकार परिषद.

 

 

 

Protected Content