Home Cities जळगाव दिवाळीपूर्वी थकीत रक्कम द्या; अन्यथा तीव्र उपोषण! एसटी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचा इशारा

दिवाळीपूर्वी थकीत रक्कम द्या; अन्यथा तीव्र उपोषण! एसटी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचा इशारा

0
4


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्य परिवहन सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, महाराष्ट्र (जळगाव विभाग) यांच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी ३ नोव्हेंबर २०२६ रोजी जळगाव येथील नवीन बसस्थानकासमोर आक्रोश धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत आर्थिक देणी दिवाळीपूर्वी एकरकमी अदा करावीत, अशी मागणी संघटनेने केली असून, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पद्मालय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या विविध आर्थिक मागण्या दीर्घकाळापासून प्रलंबित असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. करारानुसार २०१६ ते २०२० या कालावधीतील वाढीव वार्षिक वेतनवाढ, महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यासह सर्व थकीत रक्कम एकरकमी व तातडीने अदा करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

सन २०२० ते २०२४ या कालावधीतील भविष्य निर्वाह निधी आणि सेवा उपदानाचा फरक देण्यात आला आहे; मात्र याच कालावधीतील रजेच्या फरकाची रक्कम अद्याप मिळालेली नसल्याचा दावा संघटनेने केला आहे. ही रक्कमही तातडीने अदा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

एसटी महामंडळाच्या ईव्ही बससह सर्व प्रकारच्या बसमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास पासच्या आधारे वर्षभर विनाशुल्क प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे. तसेच सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना किमान ७ हजार ५०० रुपये अधिक महागाई भत्ता इतके मासिक पेन्शन मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

सप्टेंबर २०२५ पासून तांत्रिक अडचणींमुळे बंद असलेले काही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन तातडीने सुरू करावे, कोविड काळात सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांना कोविड भत्ता द्यावा आणि प्रलंबित रजा रोखीकरणाची रक्कम अदा करावी, या मागण्यांचाही आंदोलनात समावेश आहे.

या मागण्यांकडे शासन आणि एसटी महामंडळ प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ३ नोव्हेंबर रोजी नवीन बसस्थानकासमोर आक्रोश धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दिवाळीपूर्वी थकीत देणी मिळावीत, अशी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची अपेक्षा असून, मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

या आंदोलनात विभागीय सचिव सुरेश चांगरे, अध्यक्ष योगराज पाटील, केंद्रीय सदस्य गुलाब शेख, विलास पाटील, अशोक गाडे, आर. के. पाटील, सुनील बडगुजर, संजय सूर्यवंशी, दिलीप सूर्यवंशी, मुकुंद वाणी, सुनील पाटील, उदय भोसले, रामभाऊ सोनवणे आणि पुजारी साहेब यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सेवानिवृत्त कर्मचारी सहभागी होणार आहेत.

 


Protected Content

Play sound