नाबार्ड, सिडबी व एनएचबीला ५० हजार कोटींचे पॅकेज-आरबीआय गव्हर्नरांची घोषणा

नवी दिल्ली वृत्तसंस्था । कोरोनाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर अत्यंत विपरीत परिणाम होणार असला तरी भारताची स्थिती भक्कम असल्याची ग्वाही आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी त्यांनी कोरोनामुळे झालेली हानी भरून निघण्यासाठी अनेक उपाययोजनांची घोषणा केली. यात नाबार्ड, सिडबी व एनएचबीला ५० हजार कोटींच्या पॅकेजसह अनेक उपाययोजनांचा समावेश आहे.

याबाबत वृत्त असे की, सध्या सुरू असणार्‍या लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमिवर, भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे काही महत्वाच्या घोषणा करण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. या पार्श्‍वभूमिवर, आज सकाळी आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी प्रारंभी कोरोनाच्या प्रतिकारासाठी कार्यरत असणार्‍या सर्वांचे आभार मानले. यानंतर ते म्हणाले की, लॉकडाऊनच्या कालावधी बँक आणि अन्य वित्तीय संस्थांनी आपला कारभार सुरू ठेवल्याने नागरिकांना सुविधा मिळाली. २०२० मध्ये महामंदी येणार असल्याची भाकिते आता करण्यात येत आहे. वैश्‍विक अर्थव्यवस्थेसाठी हा खूप नैराश्याचा कालखंड राहणार आहे. कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला ९ ट्रिलीयन डॉलर्सची हानी होण्याची भिती आहे. या कालावधीतही भारताच्या विकासाचा दर समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. इतर देशांपेक्षा भारताची स्थिती ही बरी राहणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून मान्सूनपूर्व कामे सुरू झाली असून यंदा पाऊस चांगला राहणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. कोरोनामुळे निर्यात वाढली आहे. ऑटोमोबाईल सारख्या अनेक क्षेत्रांना मंदीचा फटका बसणार असल्याचे ते म्हणाले. तथापि, जी-२० देशांमध्ये भारताची अवस्था चांगली राहणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला.

आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास पुढे म्हणाले की, लॉकडाऊनच्या कालावधी ऑनलाईन व्यवहार व इंटरनेटशी संबंधीत अन्य व्यवहार अव्याहतपणे सुरू राहिले आहेत. ९१ टक्के एटीएम सुरू असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. याप्रसंगी त्यांनी महत्वाच्या घोषणा केल्या. यात कोरोनाच्या प्रतिकारासाठी लिक्वीडीटी मॅनेजमेंट महत्वाचे असल्याचे दास म्हणाले. यासाठी टीएलटीआरओ २.० ही प्रणाली उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली. याच्या माध्यमातून १५ हजार करोड रूपयांची उभारणी करण्यात येणार आहे. यातील निम्मी रक्कम ही लहान व मध्यम आकारमानाच्या व्यावसायिकांना मदतीसाठी वापरण्यात येईल. आजपासून याचे नोटिफिकेशन जारी करण्यात आल्याची घोषणा देखील दास यांनी केली.

दरम्यान, नाबार्ड, सिडबी आणि नॅशनल हाऊसींग बँक या वित्तीय संस्थांसाठी ५० हजार करोड रूपयांची मदत देखील दास यांनी दिली. यातील २५ हजार करोड रूपये नाबार्डला, सिडबीला १५ हजार तर एनएचबीला १० हजार करोड रूपयांचे पॅकेज देण्यात येणार असल्याची घोषणा शक्तीकांत दास यांनी केली. मदतीची अजून आवश्यकता भासल्यास आरबीआय या प्रस्ताववार विचार करणार असल्याचे संकेत देखील त्यांनी दिले. तर रिव्हर्स रेपो रेट हा ४ टक्क्यांवरून ३.७५ टक्के करण्यात येत असल्याची घोषणा देखील त्यांनी केली. यामुळे गृहकर्जासह अन्य कर्जाचे हप्ते कमी कमी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content