जळगाव, प्रतिनिधी । केंद्र शासनाच्या मुद्रा योजनेच्या माध्यमातून होतकरू तरूणांना स्वयंरोजगारास प्रोत्साहीत करावे. त्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी बँक प्रशासन आणि ग्राहक यांच्यात समन्वय राखावा, असे आवाहन खासदार रक्षाताई खडसे यांनी रावेर येथील मुद्रा योजनेच्या तालुकास्तरीय मेळाव्यात केले.
येथील नाईक महाविद्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री मुद्रा योजना व इतर शासकीय योजनांचा तालुकास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ रंजना पाटील, रावेरचे नगराध्यक्ष दारा मोहम्मद, सावदाच्या नगराध्यक्षा अनिता येवले, पं.स.सभापती जितेंद्र पाटील, प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, श्रीराम फौंडेशनचे अध्यक्ष श्रीराम पाटील, तहसीलदार अभिलाषा देवगुणे, रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन हेमंत नाईक, राजन पाटील, नगरसेवक शे. सादिक, केंद्र प्रमुख कामालोद्दीन शेख, प्र.गटविकास अधिकारी हबीब तडवी, प्राचार्य दलाल, कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. सर्वप्रथम मुद्रा लोन योजनेचे लाभार्थी प्रकाश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर नगरपालिका प्रकल्प संचालक निलेश पाटील यांनी बचत गटांच्या योजनांची सविस्तर माहिती दिली.
श्रीराम उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीराम पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, प्रत्येक व्यक्तीने आपल्या आर्थिक विकासासाठी बँक व्यवहार समजून घेणे आवश्यक आहेत. कर्ज घेतांना आपण व्यवसाय करण्यासाठीच स्वीकारा, केवळ मिळते म्हणून घेऊ नका. कर्ज घेण्याआधी सुरू करावयाच्या उद्योगाचा परिपूर्ण अभ्यास करावा. ग्रामीण भागात अनेक होतकरू तरूण आहेत. त्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपला विकास करावा.
प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी सांगितले की, भारताच्या विकास दरामध्ये 40 टक्के सहभाग हा लघु उद्योगाचा असून त्यांना अधिक बळकट करून पाठबळ देण्याचे काम मुद्रा योजना करीत आहे. आजचा युवक भरकटत आहे त्याला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम शासन करीत आहे. प्रत्येक व्यक्ती हा आर्थिक साक्षर होणे आवश्यक आहे. कर्ज मिळत नाही म्हणून बँकेविषयी गैरसमज करून घेऊ नये. आपल्या अंगी असलेल्या कौशल्याला भरारी देण्याचे देखील त्यांनी तरूणांना आवाहन केले.
खासदार रक्षाताई खडसे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, प्रधानमंत्र्यांच्या स्वप्नांना आपण बळ देवू या. यासाठी मुद्रा योजनेचे लाभ घेऊन नव्हता व लघु उद्योजकांनी आपला विकास करावा. कर्ज देतांना बँकांना देखील काही बंधने आहेत त्यांच्या अडचणी देखील आपण सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन शे. गजाला तबस्सुम आणि ज्योती बोंडे यांनी केले. मेळावा यशस्वीतेसाठी जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन कार्यालयाचे सुनील जोशी, अनिल सूर्यवंशी, जिल्हा उद्योग केंद्राचे सुनील पाटील यांच्यासह विविध शासकीय विभागाचे कर्मचारी, बँक प्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले.