नगरदेवळ्यातील युवकाचा प्रामाणिकपणा : एक किलो सापडलेली चांदी केली परत

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी   | सध्याच्या युगात प्रामाणिकपणा शोधून सापडत नाही. परंतु आजही असे काही तरुण आहेत जे आपल्या कर्तव्याने जिवंत उदाहरण लोकांसमोर ठेवतात व यामुळे समाजात एक आदर्श निर्माण होत असतो. जगण्याला एक नवी दिशा प्राप्त होते. सराफा व्यावसायिकाची बसमध्ये नजरचुकीने राहून गेलेली एक किलो चांदी एका युवकाने प्रामाणिकपणे परत केली. त्याच्या या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

 

 

जळगाव – पाचोरा बस क्रमांक एम. एच. २० बी. एल.१८३६ मध्ये येथील सराफा व्यापारी रोहित सोनार हे आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने जळगावहून नगरदेवळा येत असतांना वरील बसमधून पाचोरा येथे उतरतांना आपली ६५ हजार रुपये किंमतीची एक किलो चांदी सदर बसमध्ये विसरून गेले. गाडीतून उतरून नगरदेवळा येथे येत असतांना त्यांना अचानक त्याची आठवण झाली. त्यांनी ताबडतोब त्यांचे मित्र गोलू पाटील यांना संपर्क साधला. गोलू पाटील यांनी बस डेपोत कार्यरत असलेले प्रयास पाटील यांना संपर्क साधून सर्व हकीकत सांगितली. यानंतर प्रयास पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता सदर बस चेक करत ती चांदी ताब्यात घेतली. यानंतर रोहित सोनार यांना संपर्क साधून त्यांची वस्तू सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली. यानंतर रोहित सोनार यांना बस डेपोमध्ये बोलावून संबंधित वस्तू त्यांचीच असल्याची खात्री करून ती त्यांना परत करण्यात आली. यावेळी दिनकर पाटील, राहुल पाटील, गुलाब पाटील, प्रयास पाटील, गोलू पाटील व रोहित सोनार उपस्थित होते. रोहित सोनार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व आपली वस्तू सुरक्षित परत मिळाल्याने आनंद व्यक्त केला. प्रयासने दाखविलेल्या तत्परतेने आज रोहित सोनार यांची वस्तू त्यांना परत मिळाल्याने त्यांचे परिसरात कौतुक होत आहे.

 

Protected Content