होय, मंगेशदादाच बनणार दुध संघाचे कॅप्टन ! : लवकरच होणार निवड

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी- एक्सक्लुझीव्ह रिपोर्ट | जिल्हा दुध संघात दणदणीत विजय संपादन केल्यानंतर संस्थेच्या चेअरमनपदी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची निवड निश्‍चीत मानली जात आहे.

राज्यात सत्तांतर होऊन भाजप-शिंदे गटाचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर काही दिवसांमध्येच जिल्हा दुध संघाची कार्यकारिणी बरखास्त होऊन प्रशासक मंडळाची नियुक्ती झाल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली होती. विशेष करून कार्यकारी मंडळाला ऑक्टोबर अखेर पर्यंत मुदत असतांना प्रशासक मंडळाकडे कारभार आला. अर्थात, मंडळाला कार्यभार सांभाळण्याच्या पहिल्या टप्प्यातच आलेल्या अडचणी लक्षात घेता पुढे संघर्ष होणार असल्याचे संकेत मिळाले होते. आणि झाले देखील तसेच !

मुख्य प्रशासक मंगेश चव्हाण यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दुध संघातच ठाण मांडले. यासाठी ते अनेक दिवस जळगावात मुक्कामी राहिले. या कालावधीत त्यांनी आधीच्या संचालक मंडळाची अनेक प्रकरणे शोधून काढली. यानंतर त्यांच्यासह अरविंद देशमुखयांनी या संदर्भात पोलीसात तक्रारी दाखल केल्याने दोन्ही गटांमध्ये मोठा संघर्ष उफाळून आला. नंतर निवडणूक लागली व मध्येच स्थगिती आली. याप्रसंगी आमदार मंगेश चव्हाण यांनी दोन्ही मंत्र्यांच्या मदतीने थेट स्पेशल केस म्हणून जळगाव दुध संघाच्या निवडणुकीला परवानगी मिळविली तेव्हाच त्यांनी हा विषय किती गांभिर्याने घेतलाय हे दिसून आले होते.

दुध संघाच्या निवडणुकीच्या प्रचारात मंगेश चव्हाण यांनी थेट माजी अध्यक्षा मंदाताई खडसे यांना आव्हान दिले तेव्हा सर्वच जण अवाक झाले. खडसेंच्या होम पीचवर ते टिकाव धरू शकणार का ? याबाबत साशंकता व्यक्त करण्यात आली. मात्र मंगेश चव्हाण यांनी एकीकडे पडद्याआड अचूक रणनिती आखतांनाच जाहीरपणे थेट खडसेंना अंगावर घेतले. नाथाभाऊंच्या राजकीय कारकिर्दीत कुणी घेतला नसेल तितका टोकाचा विरोध त्यांनी केला. प्रचाराच्या कालावधीत खडसे आणि चव्हाण यांच्यात अक्षरश: जुंपल्याचेही दिसून आले. निकालाच्या आदल्या दिवशीच खडसेंनी विजयाचा दावा केला होता. तर स्वत: मंगेश चव्हाणांनी खडसेंचा आयुष्यातील सर्वात मोठा पराभव होणार असल्याचे भाकीत केले होते. ते आज सत्यात उतरले.

जिल्हा दुध संघात शेतकरी विकास पॅनलला बहुमत मिळाल्याने आता चेअरमन कोण बनणार ? याची उत्सुकता लागली आहे. विद्यमान संचालक मंडळात गिरीशभाऊ आणि गुलाबभाऊ या दोन्ही मातब्बर मंत्र्यांसह चिमणआबा पाटील यांच्यासारखे ज्येष्ठ व अगदी ४२ वर्षांचा अनुभव असणारे संचालक आहेत. तथापि, विश्‍वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार मंगेश चव्हाण हेच दुध संघाचे चेअरमन बनणार असल्याचे समजते. या संदर्भात लवकरच अधिकृत घोषणा आणि नंतर निवड होणार आहे. यामुळे अगदी तरूण वयातच आमदारकी मिळविल्यानंतर मंगेश चव्हाण यांच्याकडे दुध संघाच्या चेअरमनपदाची जबाबदारीची धुरा मिळणार आहे. राजकीय पाठोपाठ सहकारातील मोठे पद त्यांना मिळणार असल्याचेही अधोरेखीत झाले आहे.

Protected Content