दिल्लीतील शेतकरी आंदोलकांच्या मुस्कटदाबीचां चोपडा येथे निषेध

 

चोपडा : प्रतिनिधी । शेतकरी आंदोलकांची धरपकड व मुस्कटदाबीचा आणि पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीचा निषेध म्हणून आज हुतात्मा दिनी चोपडा येथे गांधी पुतळ्याजवळ लालबावटा शेतमजूर युनियन व आयटकतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले

दिल्ली येथे सरकारने शेतकऱ्यांना व त्यांच्या संघटनांना विश्वासात न घेता जे तीन नवे कृषी कायदे केले ते भांडवलदार वर्गाच्या हितासाठी बनवलेले आहेत. कृषी कायदे रद्द करावेत म्हणून ६० दिवसापासून पंजाब, हरियाणा , उत्तर प्रदेशातील शेतकरी आंदोलन करीत आहेत. त्या आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यात आला . २६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर रॅली चालू असताना झालेल्या गोंधळास सरकार जबाबदार असतानाही सरकारने आंदोलक शेतकऱ्यांवर खापर फोडून त्यांचीच धरपकड सरकारने चालवली आहे त्याचा निषेध या आंदोलनात करण्यात आला

.या आंदोलनाचे नेतृत्व शेतमजूर युनियनचे नेते अमृत महाजन यांनी केले त्यांनी व सहकाऱ्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले ते म्हणाले की, बाजारपेठेत तेलाचे भाव उतरलेले असताना तसेच शेजारील नेपाळ श्रीलंका या देशात पेट्रोलचे भाव कमी असताना भारतात मोदी सरकार दररोज पेट्रोल गॅस डिझेल दर वाढवत आहे त्यामुळे देशातील सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाववाढ होत आहे इंधन दरवाढ रद्द करावी . स्वामीनाथन समितीचे शिफारसीनुसार शेतमालास भाव , चोपडा शहरातील विविध झोपडपट्ट्यातील शेतमजुरांसाठी पंतप्रधान रोजगार योजना, रमाई आवास योजना व इतर योजना अंतर्गत घरे बांधून द्यावी आदी १५ मागण्यांसाठी लालबावटा शेतमजूर युनियन पुढील महिन्यांमध्ये आंदोलन करणार आहे असा इशारा त्यांनी दिला

सुंदरगढी , पारधी वाडा , केजीएन कॉलनीनजीकच्या पावरा आदिवासी वस्ती , स्मशानभूमी रस्त्यानजीकच्या महिलांची वस्ती या भागात मूलभूत सुविधा निर्माण करून द्या , श्रावणबाळ, इंदिरा गांधी, संजय गांधी आदी योजनांतर्गत मिळणारे मानधन दरमहा पाच तारखेच्या आत मिळावे, या मागण्यांसाठीही आंदोलन केले जाणार आहे

आजच्या निषेध आंदोलनात चोपडा शहरातील मजूर , कष्टकरी लोकांची मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थिती होती सेवानिवृत्त एसटी कामगार संघटनेचे गजानन पोतदार , शेतकरी संघटनेचे वासुदेव कोळी , सुरेश नागदेव, ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे शेखर डावकर, हिराबाई सोनवणे , नंदाबाई चौधरी , मुंबई बारेला, बेगमबाई पारधी, संजीव पारधी, रंगुबाई बारेला, लीलाबाई चौधरी, शत्रुघन सपकाळे, भगवान गोंधळी, फिरोज खान , सुमनबाई माळी आदी या आंदोलनात सहभागी झाले होते

 

Protected Content