Home Cities चोपडा चोपडा शहरात अतिक्रमणविरोधी मोठी कारवाई ; एका दिवसात ५०० अतिक्रमणे हटवली

चोपडा शहरात अतिक्रमणविरोधी मोठी कारवाई ; एका दिवसात ५०० अतिक्रमणे हटवली

0
12


चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहतूक, पादचारी आणि व्यापाऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन नगरपालिकेने अतिक्रमण निर्मूलनाची व्यापक मोहीम हाती घेतली. मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत एका दिवसात तब्बल ५०० अतिक्रमणे हटविण्यात आली. नगरपालिकेच्या तीन स्वतंत्र पथकांनी आणि तीन जेसीबींच्या साहाय्याने ही मोठी कारवाई करण्यात आली.

मंगळवारी सकाळी १० वाजेपासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सुरू झालेली कारवाई मच्छी मार्केट, आझाद चौक, विठ्ठल मंदिर चौक, बोहरा गल्ली, मेन रोड, चावडी चौक आणि गोलमंदिर चौक या शहरातील प्रमुख भागांपर्यंत राबविण्यात आली. नगरपालिकेच्या सुमारे १५० कर्मचाऱ्यांनी दिवसभर या मोहिमेत सहभाग घेत अतिक्रमण हटविण्याचे काम केले.

अतिक्रमण हटविण्यापूर्वी नगरपालिकेने संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीसांद्वारे सूचना दिल्या होत्या. तसेच शहरात सातत्याने दवंडी देऊन नागरिकांना अतिक्रमणे स्वखर्चाने काढून टाकण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक नागरिकांनी स्वतःहून आपल्या घरासमोरील आणि व्यावसायिक आस्थापनांपुढील अतिक्रमणे काढून टाकली. मात्र ज्यांनी अद्याप अतिक्रमणे हटविली नव्हती, त्यांच्यावर नगरपालिकेच्या पथकाने थेट कारवाई केली.

नगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले की, अतिक्रमण निर्मूलनाची ही मोहीम केवळ एकदिवसीय नसून शहर कायमस्वरूपी अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासाठी दहा सदस्यांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले असून या पथकाला दररोज शहरात गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नव्याने अतिक्रमण आढळून आल्यास संबंधितांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकारही या पथकाला देण्यात आले आहेत.

या संपूर्ण मोहिमेत नगरपालिकेची तीन पथके, महावितरणचे एक पथक, पोलिस विभागाचे एक पथक तसेच दंगा नियंत्रण पथकाने महत्त्वपूर्ण सहकार्य केले. विविध विभागांच्या समन्वयातून कोणताही अनुचित प्रकार घडू न देता कारवाई शांततेत पूर्ण करण्यात आली. प्रशासनाच्या या संयुक्त प्रयत्नांमुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील अडथळे दूर होऊन वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

शहरात गेल्या काही वर्षांत अतिक्रमणांची समस्या गंभीर बनली होती. रस्त्यांवर वाढलेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीची कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांना होणारा त्रास वाढत होता. नगरपालिकेच्या या धडक कारवाईनंतर सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून शहरातील प्रमुख मार्ग अधिक प्रशस्त आणि सुरक्षित झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound