Home प्रशासन नगरपालिका भडगावात दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात ; ३८३ प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वाटप

भडगावात दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात ; ३८३ प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वाटप

0
14

भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ग्रामीण भागातील शेतकरी, पशुपालक, महिला बचत गट सदस्य आणि सुशिक्षित बेरोजगारांना दुग्ध व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान व उद्योजकतेच्या संधींची माहिती मिळावी, या उद्देशाने भडगाव येथे आयोजित दोन दिवसीय दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण व मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. या प्रशिक्षणात तालुक्यातील तब्बल ३८३ प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदवला, तर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

खान्देशभूषण ऍग्रो प्रोडूसर कंपनी, अंचळगाव, पशुसंवर्धन विभाग, भडगाव आणि कृषी विज्ञान केंद्र, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम मंगल कार्यालय, भडगाव येथे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाला विकास दूध, जळगावचे कार्यकारी संचालक शैलेश मोरखेडे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ किरण मांडवडे, खान्देशभूषण ऍग्रो प्रोडूसर कंपनीचे अध्यक्ष प्रकाश त्र्यंबक पाटील, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. एस. डी. निकम, तालुका कृषी अधिकारी दीपक ठाकुर आणि कृषी विज्ञान केंद्र, जळगावचे वरिष्ठ शास्त्रज्ञ शरद जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. दोन दिवसांच्या प्रशिक्षणामध्ये मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेची माहिती, शासकीय योजना व अनुदानाच्या संधी, पशुधनाचे आजार, लसीकरण व जंत निर्मूलन, आहार व्यवस्थापन, मुक्त संचार गोठा, स्वच्छ दूध निर्मिती, कालवड संगोपन, कृत्रिम रेतन, दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन तसेच दुग्ध प्रक्रिया उद्योग याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

डॉ. एस. डी. निकम, डॉ. विशाल गायकवाड, डॉ. ऋषिकेश मंत्री, डॉ. निलेश लाड, किरण मांडवडे, तुषार गोरे, शरद जाधव आणि तालुका कृषी अधिकारी दीपक ठाकुर यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. आधुनिक गोठा व्यवस्थापन, पशुधनाचे आरोग्य, दूध उत्पादन वाढविण्याच्या पद्धती तसेच दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीतून उपलब्ध होणाऱ्या व्यावसायिक संधी याबाबत प्रशिक्षणार्थींना माहिती देण्यात आली. दुग्ध व्यवसायाकडे केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता त्याचे व्यावसायिक नियोजन, योग्य पशुपालन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि दुग्ध प्रक्रिया उद्योगाशी जोडणी केल्यास ग्रामीण भागात रोजगार व स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात, यावर कार्यशाळेत भर देण्यात आला.

दोन दिवसीय प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल भडगाव तालुक्यातील ३८३ प्रशिक्षणार्थींना अधिकृत प्रशिक्षण प्रमाणपत्रांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रशिक्षणामुळे पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांची माहिती मिळून त्यांच्या दुग्ध व्यवसायाला चालना मिळण्यास मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी खान्देशभूषण ऍग्रो प्रोडूसर कंपनीचे संचालक कमलेश देसले, बोदडें दूध उत्पादक सहकारी संस्थेचे सचिव वाल्मिक पाटील तसेच पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी अनिल सोनावणे आणि निलेश भोसले यांनी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound