काबुल : वृत्तसंस्था । दोन दिवसांपूर्वी एका महिला टीव्ही अँकरने तालिबानच्या प्रवक्त्याची मुलाखत घेतली. महिला अँकरला मुलाखत दिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
अफगाणिस्तानची सर्व सूत्र तालिबानच्या हाती आल्यानंतर तिथल्या परिस्थितीत तात्काळ बदल झाला आहे. अफगाणिस्तानातील सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. विशेष करून महिला वर्गामध्ये दहशत पसरली आहे. तालिबानच्या राजवटीत महिलांनी नरकयातना भोगल्या आहेत. त्यामुळे ती परिस्थिती आठवून महिला वर्ग भयभीत आहे. आता तालिबानने देशात पुन्हा सत्ता प्रस्थापित केली आहे. मात्र यावेळी तालिबान आपलं रुपडं बदलण्याच्या मनस्थितीत असल्याचं दिसत आहे. महिलांना विशेष अधिकार देण्याची तयारी तालिबाननं केल्याचं दिसत आहे.
अफगाणिस्तानमधील टोलो न्यूज चॅनेलनं तालिबान प्रवक्ता मौलवी अब्दुलहक हेमाद याची मुलाखत घेतली. ही मुलाखत महिला अँकर बेहेशता अरघंद हिने घेतली. अफगाणिस्तानमध्ये पहिल्यांदाच एका महिला अँकरने तालिबानच्या वरिष्ठ सदस्याची मुलाखत घेतल्याचा दावा टोलो न्यूजने केला आहे. महिला अँकर तालिबानच्या प्रवक्ताला निर्भीडपणे प्रश्न विचारत असल्याचं दिसत आहे. या मुलाखतीचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. टोलो न्यूजचे संस्थापक साद मोहसेनी यांनी तालिबानच्या प्रवक्त्यांना तुमची मुलाखत एक महिला अँकर घेणार असं सांगितलं. त्यावर त्यांनी कोणतीही आडकाठी न आणता होकार दिला. ते सांगू शकले असते की अँकर बदला. मात्र त्यांनी तसं केलं नाही, अशी माहिती मोहसेना यांनी दिली. मौलवी हेमाद असे या तालिबानी प्रवक्त्याने नाव आहे
संपूर्ण जगाला माहिती आहे. तालिबान अफगाणिस्तानचं प्रशासन चालवत आहे. मी ऐकून हैराण आहे की, लोकं तालिबानला घाबरत आहेत. आम्ही अल्लाचे आभार मानतो, संघटनेनं आपलं लक्ष्य गाठलं आहे. यासाठी तालिबानचे कित्येक लोकं शहीद झाले आहेत. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता येणं ही चांगली स्थिती आहे. कारण युद्धात मारल्या गेलेल्या सामन्य नागरिकांची संख्या ५० पेक्षा कमी आहे. तालिबानचे संस्थापक मुल्ला उमर यांचा आदेश तालिबानसाठी महत्त्वाचा आहे. त्यांनी सांगितलं आहे की, लोकांमध्ये तालिबानबाबत दहशतीचं वातावरण नसावं. त्यामुळे तालिबाननं देशातील कुणालाही त्रास दिलेला नाही असे हा प्रवक्ता म्हणाला .
चॅनेलने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महिला पत्रकारांना १५ ऑगस्टला घरी पाठवलं होतं. मात्र दोन दिवसात त्या कामावर परत आल्या आणि अफगाणिस्तानात रिपोर्टींग सुरु केली. यापूर्वी तालिबानच्या शासन काळात महिलांना काम करण्याचे अधिकार नव्हते. मात्र आता तालिबानच्या विचारात बदल झाल्याचं दिसून येत आहे. महिलांना काम करण्याचा अधिकार दिला जाणार आहे. तालिबानच्या शासनकाळात मीडियाला स्वातंत्र्य असेल, मात्र चरित्र हनन न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे तालिबानच्या वक्तव्याचा दुसरा अर्थही काढला जात आहे. लवकरच तालिबान मीडियावर प्रतिबंध लावेल असं सांगण्यात येत आहे. मोहसेनी यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. “अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आहे. त्यांच्यावर टीका केली तर काय होईल?, याचा आम्हाला अंदाज आहे.’, असं टोलो न्यूजचे संस्थापक मोहसेनी यांनी सांगितलं.