टपाल कार्यालयांची सेवा सुविधापूर्ण व लाभदायी

 

भुसावळ, प्रतिनिधी । येथील टपाल कार्यालयाने गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचे काम केले आहे. शासनाच्या विविध योजना प्रत्येकापर्यंत पोहोचून लाभ मिळावा यासाठी टपाल कार्यालयातील सेवा ही अत्यंत सुविधापूर्ण व लाभदायी असल्याचे प्रतिपादन भुसावळ डाक विभागाचे अधीक्षक पी. बी. सेलूकर यांनी केले. ९ ऑक्टोबर जागतिक टपाल दिनानिमित्त भुसावळ डाक विभागाच्या मुख्य कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रमुख अतिथी म्हणून पोस्ट फोरमचे सदस्य डॉ. जगदीश पाटील, प्रमोद शुक्ला, श्रीमती एस. एस. कवीश्वर, व्ही. बी. निकम यांच्यासह सहाय्यक डाक अधीक्षक एस. एस. म्हस्के, निरीक्षक निशांत शर्मा, भुसावळ पोस्ट मास्तर एजाज शेख, कार्यालय सहायक आर. आर. पाटील उपस्थित होते. राकेश पाटील यांनी गेल्या सहा महिन्यातील लॉकडाउनच्या कालावधीत बचत ठेव, पुनरावृत्ती ठेव खाते, सावधी जमा खाते, मासिक योजना, लोक भविष्य खाते, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, राष्ट्रीय बचत पत्रे, किसान विकास पत्र, सुकन्या समृद्धी योजना अशा विविधांगी योजनांचे २३ हजार ३४६ खाते उघडण्यात आले असल्याचे सांगितले. तसेच एकत्रित तब्बल १६० कोटी २३ लाख रुपयांची गुंतवणूक टपाल खात्यात ग्राहकांनी केली आहे. भुसावळ विभागात भुसावळसह जामनेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर, रावेर व बोदवड या तालुक्यातील सुमारे 35 कार्यालय आणि सहाशे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून टपाल कार्यालयाचे काम उत्कृष्ट सुरू असल्याचे अधीक्षक पी. बी. सेलूकर यांनी सांगितले. पोस्ट फोरमचे सदस्य डॉ. जगदीश पाटील, प्रमोद शुक्ला यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर पोस्ट कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

उद्या बचतदिनी ग्राहकांचा सन्मान –
उद्या शनिवार दि. १० ऑक्टोबर रोजी बचत दिन असून त्यानिमित्त भुसावळ विभागातील प्रत्येक कार्यालयात कार्यालय उघडल्यानंतर येणाऱ्या पहिल्या ग्राहकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तसेच भुसावळ येथील मुख्य कार्यालयात सत्काराचा छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला असून ज्यांनी बचत खात्यात उत्कृष्ट काम केले आहे अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव केला जाणार आहे. त्याचप्रमाणे जुन्या खातेदारांचा देखील सत्कार करण्यात येणार असल्याचे अधीक्षक सेलूकर यांनी सांगितले.

Protected Content