‘९ ऑगस्ट’ – प्रशासनाला आदिवासींना दिलेल्या अधिकारांची जाणीव करुन देणारा दिवस – जिल्हाधिकारी

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील शिवतीर्थ मैदानावर  आज सकाळी ११ वाजता आदिवासी जननायक तंट्या मामा भील व वीर एकलव्य, धरतीआबा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे पूजन जिल्हाधिकारी अभिजित राउत यांचा हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ‘आजचा दिवस प्रशासनाला आदिवासींना दिलेल्या अधिकारांची जाणीव करुन देणारा दिवस असल्या’चे त्यांनी सांगितले.

आज मंगळवार, दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जी एस ग्राउंड अर्थात शिवतीर्थ मैदानावर आदिवासी जननायक तंट्या मामा भील व वीर एकलव्य, धरतीआबा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे पूजन जिल्हाधिकारी अभिजित राउत यांचा हस्ते करण्यात आले.

स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत आणि आज आदिवासी गौरव दिनाच्या बरोबर क्रांतीदिनही आहे. त्याचे औचित्य साधत लोहरा गावच्या वाकलीबाई बारेला, तांबा पुऱ्यातील वत्सलाबाई मोरे यांना तिरंगा देवून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सुरुवात करण्यात आली.

जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी आदिवासी दिनाचे महत्व विषद करताना सांगितले की, “भारतीय संविधानाने कलम ३७१ च्या अंतर्गत आदिवासींना विशेष अधिकार दिलेले आहेत आणि तरीही त्यांची आर्थिक परिस्थितीत व विकास म्हणावा तसा झालेला नाही. त्यामुळे एका बाजूला आदिवासी अस्मितेचा गौरव व दुसऱ्या बाजूला प्रशासकीय अधिकाऱ्याला आपल्या कर्त्यव्यांची आठवण करून देणारा हा दिवस आहे. या दिवसी आपण आदिवासीच्या विकासाचे स्वप्न पाहूयात. लोक संघर्ष मोर्चाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आदिवासींचा ठळक सहभाग नोंदवला. याचा मला आनंद आहे.” असे त्यांनी सांगितले.

यावेळी लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी प्रतिपादन केले की, “दि.२३ डिसेंबर १९९४ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने एक ठराव पारीत करुन दि. ९ ऑगस्ट हा दिन दरवर्षी ‘जागतिक आदिवासी दिवस’ म्हणून साजरा करण्याचे ठरवले. त्यापूर्वी १९९३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय आदिवासी लोकांचे वर्ष म्हणून साजरे केले गेले होते. दरवर्षी संयुक्त राष्ट्रसंघ दि. ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाची थीम घोषीत करतो. यावर्षीची थीम आहे ‘पारंपारिक ज्ञानाचे जतन आणि प्रसारामध्ये आदिवासी महिलांची भुमिका’ आदिवासी महिला या आदिवासी समुदायाच्या कणा आहेत आणि पारंपारीक वडिलोपार्जीत ज्ञानाचे जतन आणि प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. नैसर्गिक संसाधनाची काळजी घेणारे आणि वैज्ञानिक ज्ञानाचे रक्षक म्हणुन त्यांची अविभाज्य सामुहिक आणि सामुदायिक भुमिका आहे. अनेक आदिवासी महिला मातृभूमीच्या रक्षणासाठी पुढाकार घेतल्याचा घटना आहेत आणि जगभरातील आदिवासी लोकांच्या सामुहिक हक्कांसाठी न्यायिक लढा लढत आहेत. भारतात देखील आदिवासी महिलांनी आपल्या कर्तुत्वाने पारंपारीक ज्ञानाचे योगदान दिले आहे.

भारतीय स्वांतत्र्य चळवळीत महात्मा गांधी यांनी सत्याग्रह आणि उपोषणाचा वापर केला. त्याप्रमाणेच आपले हक्क आणि न्यायिक मागण्या यासाठी आदिवासी महिला-पुरुष आंदोलनावेळी आपला पारंपारीक पोशाख परिधान करुन ढोल वाजवून पारंपारिक न्यृत्य आणि गाण्यांचा वापर करतात. त्यातुन आपला आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याबरोबरच संस्कृतीचे संवर्धन आणि जतनही करत आहेत. याचे सर्व श्रेय लोकसंघर्ष मोर्चाच्या नेतृत्वाला जाते आणि लोकसंघर्ष मोर्चाच्या महिलांची घोषणाच बनली आहे ‘बायऱ्या बायऱ्या जमनाऱ्या; नव निर्माण करणाऱ्या’ अर्थात ‘सर्व महिला एकत्र येवू आणि समतेवर आधारित समाजाचे नवनिर्माण करु.’ असं नव निर्माणाच्या कार्यही केले आहे आणि म्हणून मूळ निवासींच्या या लढ्याला सलाम.”

याप्रसंगी आदिवासी बांधव आपल्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. तिर कमान, बिलखे, शिबली ढोल असे पारंपरिक वाद्य व नृत्याचे प्रकार या रॅलीत होते. ही रॅली जी. एस. ग्राउंडवरून निघून बस स्टँड, आकाशवाणी चौक मार्गे एकलव्य क्रीडा संकुल येथे वीर एकलव्य यांच्या पुतळ्याला हार घालून समाप्त झाली.

या रॅलीत प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, भरत कर्डिले, विष्णू भंगाळे, विनोद देशमुख, गणी मेनन, मुकुंद सपकाळे,  पुंडलिक सपकाळे, भैय्या चव्हाण कानळदा, शांताराम पाटील नांद्रा, संजय पाटील फुकणी, सुभाष पवार, कल्पना पाटील, ॲड धुमाळ, शिक्षक भारतीचे अजय पाटील, प्रमोद पाटील, अमोल, योगेश कदम, अजय सोनवणे, भाऊ सपकाळे, भैया चव्हाण, इरफान तडवी, इन्का बारेला, नुरा तडवी, मन्सूर तडवी, कैलास मोरे, निवेदिता ताढे, सरिता नेरकर, राणा चव्हाण, गणेश सूर्यवंशी, अशोक सोनवणे, चंद्रकांत चौधरी हे उपस्थित होते.

Protected Content