फटाक्यांमुळे बळावू शकतो कोरोना – प्रा.कट्यारे

 

जळगाव प्रतिनिधी । गेल्या ८ महिन्यापासून कोरोना या साथीच्या आजारामुळे देशासह जगातील नागरिक त्रस्त आहे. सध्या कोरोना हा आटोक्यात आहे. मात्र त्याची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. सध्या दिवाळी सण आलेला असून यावेळी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डी. एस. कट्यारे यांनी केले आहे. फटाक्यांनी श्वसनाचे विकार जडत असल्याने कोरोना आणखी बळावू शकतो असेही त्यांनी म्हटले आहे.

जळगावात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने कोरोनामुक्त व प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी फटाकेमुक्त दीपावली अभियान राबवले जात आहे. यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील, अंनिसचे राज्य पदाधिकारी डॉ. प्रदीप जोशी, जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल पाटील, मविपचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी आवाहन केले आहे. उपक्रमाचे प्रमुख जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डी.एस.कट्यारे, मविपचे सचिव प्रा. दिलीप भारंबे आहेत.

कोरोना पिडीताना श्वास घेताना होणारा त्रास हा फुफ्फुसांशी संबंधित असतो. कोरोना झालेल्यांना सामान्य होण्यासाठी देखील बराच वेळ लागतो. त्यांच्यासह फुफ्फुस, हृद्य व इतर आजारांनी पिडीत असलेल्या रुग्णांनाही फटाके फुटल्यावर निघणा-या धुराचा त्रास होत असतो. म्हणूनच कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाच्या परिपत्रकानुसार सणाचे साजारीकरण हे जनसमुदायाला नवचैतन्य देणारे असावे. म्हणून फटाके न फोडता सामाजिक बांधिलकी म्हणून गरीब व गरजवंतांना मदत करा, असे आवाहन अंनिस व मविपतर्फे करण्यात आले आहे.

Protected Content