नवी दिल्ली : वृत्तसंस्था । नविन गाडी खरेदी करताना जुनी गाडी स्क्रॅप न करणाऱ्यांना आता अतिरिक्त कराचा भुर्दंड सहन करावा लागणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी स्पष्ट केले.
अर्थसंकल्पामध्ये स्वैच्छिक वाहन स्क्रॅपेज धोरणाची घोषणा करण्यात आली. या योजनेमुळे वाहन उद्योगाला उभारी मिळेल, असे म्हटले जाते. येत्या काळात वाहन उद्योगात ३० टक्के वाढ होऊन उलाढालीचा व्याप १० लाख कोटी रुपये होईल, असेही गडकरी म्हणाले. नवी वाहने खरेदी करताना जुनी वाहने स्क्रॅप केल्यास खरेदीवर अनेक लाभ देण्याचीही घोषणा करण्यात आली.
स्क्रॅपेज धोरण फायदेशीर ठरेल. यामुळे अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन मिळेलच, मात्र त्यासोबत प्रदूषण कमी करण्यास मदत होईल. स्वैच्छिक वाहन स्क्रॅपेज धोरणानुसार खासगी वाहनांची २० वर्षांनी तर व्यावसायिक वाहनांची १५ वर्षांनी फिटनेस टेस्ट होईल, असेही गडकरींनी नमूद केले. लवकरच स्वैच्छिक वाहन स्क्रॅपेज धोरण राबवण्यात येईल. जे लोक या धोरणाचा अवलंब करणार नाहीत त्यांच्या वाहनांवर हरित कर आणि अन्य कर आकारण्यात येतील. अशा वाहनांना ‘ऑटोमेडेट फिटनेस टेस्ट’ ही करावी लागेल.