जिल्ह्यात केळी संशोधन विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील : पालकमंत्री गुलाबराव पाटील

 

जळगाव  (प्रतिनिधी)  देशात जळगाव जिल्ह्यात केळी लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्र असलेल्या या क्षेत्राच्या विकासासाठी जळगाव जिल्ह्यात केळी संशोधन विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील राहू. केळी संशोधन केंद्राचे बळकटीकरण व विस्तारीकरणासाठी कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्यासमवेत बैठक घेवून हे काम प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करू, असे प्रतिपादन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

 

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीअंतर्गत केळी संशोधन केंद्र जळगाव येथील शेतकरी शास्त्रज्ञ मंच सभा पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेाखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संशोधन केंद्राचे डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. व्ही डी. शेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, के. बी. पाटील आदी उपस्थित होते.

 

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की ,कुठलेही काम करताना समाजसेवेचे व्रत म्हणून केल्यास लाभ होतो. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना याच भावनेतून मार्गदर्शन करावे. शेतकऱ्याची शेती फायद्यात येण्यासाठी व अधिक उत्पादनासाठी त्यांना आधुनिक तत्रंज्ञानाची माहिती द्यावी.
के. बी. पाटील म्हणाले की, जिल्ह्याचा दोन हजार कोटी रुपयांचा व्यापार हा केळी पिकावर अंवलबून आहे. केळी पिकावर येणाऱ्या रोगाचे निदान करण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा (पॅथॉलॉजी लॅब) या केंद्रात असणे आवश्यक आहे. कृषी उपसंचालक अनिल भोकरे म्हणाले, की जळगाव जिल्ह्याचा विकास दर वाढविण्याकरता केळी व कापूस पिकांचे महत्त्वाचे स्थान आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांचा अधिकाधिक विकास होण्यासाठी सर्व केळी उत्पादक एकाच छताखाली आणणे आवश्यक आहे. त्याच बरोबर जिल्ह्यात केळी विकास महामंडळ स्थापन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

 

वडोदा, ता. चोपडा येथील निर्यातक्षम केळी उत्पादक संदीप सुभाष पाटील म्हणाले की, जे शेतकरी निर्यातक्षम केळी उत्पादन करतात त्यांना प्रोत्सहनात्मक अनुदान मिळावे . तसेच केळीच्या रोपांची किंमत कमी व्हावी. त्याच बरोबर शालेय पोषण आहारात केळीचा समावेश करावा. प्रारंभी पालकमंत्री श्री. पाटील यांनी केळी संशोधन केंद्रातील केळी पिकाची पाहणी केली. तसेच अनुसूचित जाती जमाती (विशेष घटक योजनेअंतर्गत ) शेतकऱ्यांना फवारणी पंपाचे वाटप पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी केळी संशोधन केंद्राचे प्रा. एन. बी .शेख यांनी केळी संशोधन केंद्राबाबत संगणकीय सादरीकरण केले, या सादरीकरणामध्ये देशात आठ लाख पन्नास हजार हेक्टरवर केळी पिकाचे उत्पन्न घेतले जाते. तर महाराष्ट्रात 74 हजार सहाशे हेक्टर क्षेत्र केळी पिकाखाली आहे, असे सांगितले. त्यापैकी जळगाव जिल्ह्यात 41 हजार हेक्टर क्षेत्रावर केळी पिकाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी संशोधन केंद्राचे बळकटीकरण व विस्तारीकरण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. किरण जाधव यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. या प्रसंगी नाबार्डचे जिल्हा समन्वय श्रीकांत झांबरे, केळी उत्पादक शेतकरी प्रंशात महाजन, केळी संशोधन केंद्र कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Protected Content