अमळनेरच्या दंगलीतील संशयिताचा मृत्यू !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर दंगलीतील एका संशयिताचा आज जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असतांना मृत्यू झाल्यानंतर अमळनेरात सतर्कता पाळण्यात येत असून कुणीही अफवांवर विश्‍वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

अमळनेर शहरात काही दिवसांपूर्वी दोन लहान मुलांच्या भांडणाचे पर्यावसान दोन गटांमधील तुफान दगडफेकीत झाले होते. यात दोन्ही गटातील संशयितांच्या विरूध्द गुन्हे दाखल केल्यानंतर धरपकड करण्यात आली होती. यातच, अशफाक सलीम शेख ( वय ३३, रा. दर्गा मोहल्ला अमळनेर) याचा देखील समावेश होता. तो अमळनेरचे माजी नगरसेवक सलीम टोपी यांचा मुलगा असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीत असतांनाच त्याची प्रकृती खालावल्याच्या कारणावरून त्याला काल म्हणजेच १३ जून रोजी पहाटे जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, काल पहाटेपासून अशफाक शेख याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतांनाच सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्याने शेवटचा श्‍वास घेतला. अशफाकच्या मृत्यूची वार्ता पसरल्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून अमळनेरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहेत. तर या प्रकरणी कोणत्याही अफवांना थारा देऊ नका असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

यासोबत आमदार अनिल भाईदास पाटील यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून अमळनेर शहरातील सलोख्याला तडा जाईल असे काहीही न करण्याचे आवाहन केले आहे. शहरातील वातावरण नॉर्मल असून कोणताही अनुचीत प्रकार घडला नसल्याचे नमूद करत त्यांनी अफवांना थारा न देण्याचे आवाहन केले आहे.

Protected Content