विना वेतनाने बेजार; एस.टी. च्या महिला कर्मचार्‍यांना पराठा सेंटरचा आधार ! (व्हिडीओ)

जळगाव जितेंद्र कोतवाल । लॉकडाऊनमुळे अनेकांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली असून बर्‍याच जणांना वेतन मिळत नसल्याचे ते बेजार झाले आहेत. पण वेतन नाही म्हणून रडगाणे न गाता एस.टी. खात्याच्या दोन महिला कर्मचारी पराठा सेंटरच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनल्याचे सकारात्मक उदाहरण समोर आले आहे.

कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनने बहुसंख्या लोकांच्या आयुष्याला विस्कटून टाकले आहे. यामुळे अनेक जण बेरोजगार झाले असून काहींना वेतन कपात, पगार विलंबाने मिळणे आदी प्रकारांनी लोक हैराण झाले आहेत. यात लॉकडाऊनमुळे परिवहन खात्याचा चक्का जाम झालेला आहे. प्रारंभीचे दोन महिनी कपातीसह का होईना वेतन मिळाले असले तरी अलीकडच्या कालावधीत परिवहन खात्याचे वेतन थकीत असल्याने लक्षावधी कर्मचार्‍यांना काय करावे हे समजेनासे झाले आहे. या अत्यंत नाऊमेच्या कालावधीतही अनेक जण नव्या उभारीने संसाराचा गाडा चालविण्यासाठी आत्मनिर्भर होतांना दिसून येत आहेत. यातच जळगावच्या एस.टी. खात्यात लिपीक म्हणून कार्यरत असणार्‍या राखी शर्मा आणि राज्यातील पहिल्या महिला वाहक (कंडक्टर) असणार्‍या रजनी मेघे यांनी परिस्थितीला शरण न जाता आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याचा निर्धार केला. यातूनच बहिणाबाई उद्यानाजवळ श्री स्वामी समर्थ पराठा सेंटरच्या माध्यमातून त्यांनी नव्या व्यवसायाला प्रारंभ केला आहे. या सेंटरवर आलू पराठा, कोबी पराठा, मेथी पराठा, भोपळा पराठा, पोळी-भाजी, ठेचा आदी खाद्य पदार्थ उपलब्ध आहेत.

या संदर्भात राखी शर्मा म्हणाल्या की, आमची लालपरी अव्याहतपणे जनतेची सेवा करत आहे. या माध्यमातून आमचे सहकारी हे लोकांची सेवा करत आहेत. लॉकडाऊन सुरू असतांनाही आमचे काही सहकारी सेवेत आहेत. तथापि दोन महिन्यांपासून पगार नसल्याने अनेकांना अडचणी येत आहेत. सरकार व विशेष करून मुख्यमंत्री तसेच परिवहन खात्याच्या मंत्र्यांनी याची दखल घेऊन आमचे पगार करावेत अशी मागणी त्यांनी केली. तर राज्यातील पहिल्या महिला कंडक्टर असणार्‍या रजनी मेघे म्हणाल्या की, कोरोनामुळे सर्वच जणांच्या जीवनावर अत्यंत वाईट परिणाम झालेला आहे. तथापि, वेतन नसल्यामुळे आता खूप हाल होत असून सरकारने तातडीने वेतन करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

खालील व्हिडीओत पहा याबाबतचा विशेष वृत्तांत.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/677563379506612/

Protected Content