जगाचे राहू द्या साहेब, देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्का द्या ; शिवसेनेचा भाजपवर निशाना

मुंबई (वृत्तसंस्था) कोट्यवधी चुली विझताना दिसत आहेत, त्याच वेळी घराघरात भुकेचा आगडोंब उसळताना दिसत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेस गती देण्याचे सामर्थ्य हिंदुस्थानात असल्याचे मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही स्वातंत्र्यदिनी झेंडा फडकवताना व्यक्त केले. जगाचे राहू द्या साहेब, देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्का द्या. स्वातंत्र्य दिन येतो व जातो, लाल किल्ला तोच आहे, प्रश्न आणि दुःख तेच आहे, अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाल किल्ल्यावरील भाषणानंतर निशाना साधण्यात आला आहे.

 

सामानाच्या अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, देशात जे भूकमरी व बेरोजगारीचे संकट तसेच आर्थिक मंदीचा राक्षस धुमाकूळ घालतो आहे त्याच्याशी मुकाबला कसा करणार? हे संकट आजही घरात निपचीत पडून आहे. ते उपाशी पोटाची आग घेऊन घराबाहेर पडेल तेव्हा या स्वदेशी संकटाचा सामना करण्यासाठी सैन्य बोलवावे लागेल अशी चिंता आम्हाला सतावत आहे,

“हिंदुस्थानचा 74वा स्वातंत्र्य दिन कोरोनामय होता. त्याच सावटाखाली साजरा झाला. पंतप्रधानांपासून राज्याराज्यांच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांचीच भाषणे पाहिली तर कोरोना, आरोग्य सुविधा यांवरच भर देणारी आहेत. पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून लाल किल्ल्यावरून जे भाषण केले ते त्याच पद्धतीचे होते. पाकिस्तान किंवा चीनला त्यांचे नाव न घेता इशारे वगैरे देण्याचे सोपस्कार त्यांनी पार पाडले. ते नित्याचेच क्रियाकर्म आहे. चीन अद्यापि आपल्या भूमीत घुसलेलाच आहे. पाकिस्तानचे शेपूट वाकडेच आहे. जम्मू-कश्मिरात जवानांची बलिदाने आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या थांबलेल्या नाहीत. समाधानाची बाब इतकीच की, जम्मू-कश्मीरची राजधानी असलेल्या श्रीनगरच्या लाल चौकामध्ये डौलाने तिरंगा फडकला आहे. 370 कलम हटवल्याचा हा परिणाम आहे हे मान्य केले तरी तेथील रक्तपात थांबलेला नाही व भयही संपलेले नाही. जम्मू-कश्मीरमध्ये लवकरच निवडणूक घेण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. या घोषणेसाठी त्यांनी लाल किल्ल्याची निवड केली. निवडणुकीची तयारी सुरूच केली आहे. उत्तर प्रदेशचे एक भाजप नेते मनोज सिन्हा यांना जम्मू-कश्मीरचे नायब राज्यपाल म्हणून तडकाफडकी पाठवले तेव्हाच या राजकीय हालचालीचा अंदाज आला होता. पंतप्रधानांचे भाषण सर्वसमावेशक होते. कोरोनामुळे समोर गर्दी कमी होती. त्यामुळे प्रमुख मंडळींच्या चेहऱयावरचे भाव ‘मास्क’मुळे समजणे कठीण होते; पण पंतप्रधानांचा आवेश, जोश कमी झाला नव्हता. मुलींच्या विवाहाच्या वयात बदल करण्याबाबत त्यांनी लाल किल्ल्यावरून सूतोवाच केले.

 

अयोध्याप्रश्नी देशवासीयांचा संयम व शहाणपण वाखाणण्यासारखा असल्याची टिचकीही पंतप्रधानांनी मारली. हे सर्व महत्त्वाचे असले तरी पंतप्रधानांच्या भाषणाचे कूळ व मूळ आरोग्यविषयक राष्ट्रीय धोरणच होते. कोरोना महामारीवर प्रभावी इलाज ठरणाऱया एक नव्हे तर तीन-तीन लसींच्या परीक्षणाची प्रक्रिया हिंदुस्थानात सुरू असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली आहे. देशात कोरोनाचा कहर झाला आहे. गेल्या 24 तासांत 63 हजार 489 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर हजाराच्या आसपास लोक काल दिवसभरात मरण पावले. एका दिवसातला हा आक्रोश आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पंचवीस लाखांवर पोहोचली व आतापर्यंत पन्नास हजारांवर लोक या महामारीत मरण पावले. हे चित्र धक्कादायक आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी ‘लस’ येत आहे, असे लाल किल्ल्यावरून सांगणे आशादायक आहे. रशियाने सगळ्यात आधी लस आणली. त्या लसीवर जागतिक स्तरावर टीकाटिपणी सुरू आहे. रशियाने निर्माण केलेली लस ही तेथील माकडांना टोचायच्या लायकीची नाही, अशी खिल्ली अमेरिकेने उडवली. माकडांचे राहू द्या, पण कोरोनामुळे माणसे किडय़ामुंग्यांसारखी मरत आहेत. आज सगळ्यात जास्त कोरोनाग्रस्त लोक अमेरिका व आपल्या देशात तडफडताना दिसत आहेत. रशियाची लस माकडांच्या लायकीची नसेलही. मग माणसांच्या लायकीची लस बाजारात आणा व मृत्यूचे तांडव थांबवा.

 

पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेल्या तीन लसी जोपर्यंत बाजारात येत नाहीत तोपर्यंत हिंदुस्थानातील भय संपणार नाही. प्रत्येक नागरिकाला डिजिटल हेल्थ कार्ड दिले जाईल, नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनची स्थापना होईल, असे पंतप्रधानांनी जाहीर केले. या आरोग्य ओळखपत्रात डॉक्टरांच्या भेटीपासून ते औषधोपचारांपर्यंत सर्व काही असेल. हे सर्व डिजिटल प्रकरण छानच असावे; पण आजच्या कोरोना महामारीने देशासमोर जे आर्थिक महासंकट उभे राहिले आहे त्याचे काय? फक्त आत्मनिर्भर होण्याचा ढोल वाजवून हा प्रश्न तत्काळ सुटेल असे वाटत नाही. आतापर्यंत देशात 14 कोटी लोकांनी रोजगार गमावला आहे. भविष्यात हा आकडा वाढेल. लोकांना घराबाहेर पडायचे आहे; पण घराबाहेर पडून काय करायचे? नोकरीधंदा, रोजगार गेला आहे. त्यांच्या भविष्यावर पंतप्रधानांनी भाष्य केले असते तर बरे झाले असते. पंतप्रधानांनी 90 मिनिटे म्हणजे दीड तास भाषण केले. आम्हाला आव्हान देणाऱ्यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यास आपला देश सक्षम आहे.

हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेने पाहणाऱयांना, देशाच्या अखंडतेवर प्रहार करू पाहणाऱयांना ‘एलओसी’ ते ‘एलएसी’ असे हिंदुस्थानी सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले व स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून सांगितले म्हणजे त्यावर विश्वास ठेवायलाच हवा. दुश्मनांचे वाकडे डोळे बाहेर काढण्यासाठी सैन्य, हवाई दल वगैरे आहे; पण देशात जे भूकमरी व बेरोजगारीचे संकट तसेच आर्थिक मंदीचा राक्षस धुमाकूळ घालतो आहे त्याच्याशी मुकाबला कसा करणार? हे संकट आजही घरात निपचीत पडून आहे. ते उपाशी पोटाची आग घेऊन घराबाहेर पडेल तेव्हा या स्वदेशी संकटाचा सामना करण्यासाठी सैन्य बोलवावे लागेल अशी चिंता आम्हाला सतावत आहे. कोट्यवधी चुली विझताना दिसत आहेत, त्याच वेळी घराघरात भुकेचा आगडोंब उसळताना दिसत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेस गती देण्याचे सामर्थ्य हिंदुस्थानात असल्याचे मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही स्वातंत्र्यदिनी झेंडा फडकवताना व्यक्त केले. जगाचे राहू द्या साहेब, देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्का द्या. स्वातंत्र्य दिन येतो व जातो, लाल किल्ला तोच आहे, प्रश्न आणि दुःख तेच आहे!”

Protected Content