साधेपणाने साजरा होणार यंदाचा गणेशोत्सव !

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या सावटामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा होणार असून यात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय येथील बैठकीत घेण्यात आला.

सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ समिती व गणपती मंडळाची बैठक रविवारी पार पडली. यात कोरोनाच्या आपत्तीमुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने व कोणताही आरास न करता साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. याच्या जोडीला समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचेही ठरविण्यात आले.

या उपक्रमांमध्ये पांजरपोळ येथे गायींना चारा देणे, गणपती मंडळ व परिसर निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करणे, अंध व गतिमंद गरजूंना जेवण वाटप करणे, आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर घेणे, झाडे लावणे आदी कार्यक्रमांचा समावेश असेल असे याप्रसंगी ठरविण्यात आले.

या कार्यक्रमाचे नियोजन सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ ( Jalgaon Ganesh Festival 2020 )करणार आहे. या कार्यक्रमाचे प्रकल्प प्रमुखपदी हेमंत महाजन व उप प्रकल्प प्रमुखपदी विराज कावडिया यांची निवड करण्यात आली. बैठकीला सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ समितीचे सचिन नारळे, दीपक जोशी, किशोर भोसले, विराज कावडिया आदींसह अन्य पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

Protected Content