महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांचा मुक्ताईनगरात सत्कार

मुक्ताईनगर प्रतिनिधी । श्रीराम मंदिराच्या भूमिपुजन सोहळ्यासाठी अयोध्या येथून नुकतेच परतलेले महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांचा येथे सत्कार करण्यात आला.

अयोध्या येथील राममंदिर भूमिपूजनासाठी मुक्ताईच्या भूमीतील माती व तापी-पूर्णा नदीचे जल नेण्याची जबाबदारी महामंडलेश्‍वर जनार्दन महाराजांना आमंत्रणाद्वारे देण्यात आली होती. हा सन्मान मिळाल्याबद्दल मुक्ताबाई संस्थानतर्फे रवींद्र हरणे महाराज व मान्यवरांचे हस्ते महामंडलेश्‍वर जनार्दन महाराजांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी संस्थानचे व्यवस्थापक रवींद्र हरणे महाराज, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सौभाग्यवती यामिनी पाटील, उद्धव महाराज जुनारे, सभापती निवृत्ती पाटील, विहिंपचे बुलडाणा जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब करंदीकर, भाजप तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील यांच्यासह भाविक उपस्थित होते. याप्रसंगी रोहिणी खडसे यांचेतर्फे हरिपाठाचे पुस्तक आणि मास्क वाटप करण्यात आले. कारसेवकांचा गौरव झाला. प्रास्ताविक नितीन अहीर, सूत्रसंचालन विशाल महाराज खोले, तर आभार रवींद्र हरणे यांनी मानले.

या कार्यक्रमात महामंडलेश्‍वर जनार्दन हरिजी महाराज यांच्या हस्ते भास्कर चोपडे (खामगाव), बापूसाहेब करंदीकर (खामगाव), रामराव पाटील (शेंबा), भानुदास जुनारे (तांदुळवाडी), अभिमन्यू पाटील (तांदुळवाडी), वामनराव खोडपे (जळगाव जामोद) आदी कारसेवकांचा सत्कार करण्यात आला.

दरम्यान, उद्धव जुनारे महाराज यांचे वडील वै.नारायण महाराज जुनारे यांनी, जोपर्यत अयोध्येत श्रीराम मंदीर होत नाही तोपर्यत पादत्राणे घालणार नाही, असा संकल्प केला होता. अखेरचा श्‍वास घेईपर्यंत म्हणजेच २३ वर्षे त्यांनी पायात चप्पल घातली नव्हती. आता राम मंदिराचा मार्ग मोकळा झाल्यामुळे उद्धव जुनारे महाराज यांनी विणेकरी व सेवेकर्‍यांना पंचवस्त्र व पादत्राणे देऊन कृतज्ञता व्यक्त केली.

Protected Content