भाजप-सेनेकडून जनादेशाचा अपमान- खडसेंची टीका

khadse e1550572684596

मुक्ताईनगर प्रतिनिधी । राज्यातील जनतेने महायुतीला कौल दिला होता, यामुळे आता सुरू असणारे राजकीय नाट्य पाहता भाजप व शिवसेनेकडून जनादेशाचा अपमान होत असल्याची टीका माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केली आहे.

आज दिवसभर अतिशय नाट्यमय घडामोडी घडल्या. सायंकाळी भाजपने आपण सत्ता स्थापन करणार नसून शिवसेना सरकार स्थापन करत असल्यास शुभेच्छा देत आपला निर्णय जाहीर केला. यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्ता स्थापन करण्याचे आमंत्रण देऊन त्यांना चोवीस तासात आपला निर्णय कळविण्याची कालमर्यादा आखून दिली. यासोबत शिवसेना आघाडी अर्थात काँग्रेस व राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार बनविण्याच्या तयारीला लागली आहे. या घडामोडी घडत असतांना भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मात्र या प्रकरणी दोन्ही पक्षांवर जोरदार टीका केली आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत खडसे म्हणाले की, राज्यातील जनतेने महायुतीला कौल दिला होता. मात्र भाजप आणि शिवसेनेने जनादेशाचा अपमान केल्याचा घरचा आहेर त्यांनी दिला. राज्यात महायुतीचेच सरकार हवे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, सत्ता स्थापनेच्या घडामोडींमध्ये खडसे हे बाजूला पडल्याबद्दल विचारणा केली असता, ते म्हणाले की, आता पक्षात नवीन मंडळी आली असून ते पक्ष चालवत आहेत. एकूण पाहता एकनाथराव खडसे यांनी या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले आहे.

Protected Content