खिसे गरम करण्याची पद्धत गिरीश महाजन यांना माहित असेल

 

 

रावेर : प्रतिनिधी । मंत्री खिसे कसे गरम करतात ? याच्या काही पद्धती त्यांना ठाऊक असतील,ते माजी मंत्री आणि अनुभवी आहेत,त्यामुळे मंत्री खिसे कसे गरम करतात याबाबत तेच सांगू शकतील अशी खरमरीत टीका आ.शिरीष चौधरी यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केली आहे.

केळी पिक विम्याचे निकष बदलवून मिळावे यासाठी आम्ही पाठपुरवा करत असतांना,माजी मंत्री महाजन पुढे आले नाहीत, त्यांचे सहकारी राज्य सरकार बैठका घेत असतांना सामील झाले नाही.आता,मात्र मुदत संपल्यावर यासाठी आंदोलनाची भाषा करत आहे , असा वचपाही त्यांनी महाजनांवर काढला

सोमवारी जळगाव येथे केळी पिक विम्याच्या निकषाच्या मुद्द्यावर माजी मंत्री गिरीश महाजन व दोन्ही खासदार,जिल्ह्यातील भाजपचे आमदार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी सरकारवर सरसंधान साधत मंत्र्यांनी खिसे गरम केल्याचा आरोप त्यांनी केला होता.

या आरोपाचे आ.शिरीष चौधरी यांनी खंडन करून,त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.. येथील पीपल्स बँकेत झालेल्या पत्रकार परिषदेत आ.चौधरी यांनी केळी पिक विम्याच्या बाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. याप्रसंगी बाजार समितीचे माजी सभापती डॉ राजेंद्र पाटील, माजी जि.प.सदस्य रमेश पाटील, पीपल्स बँकेचे चेअरमन प्रवीण पासपोहे उपस्थित होते.
आ.चौधरी म्हणाले की.खा.रक्षा खडसे वगळता अन्य भाजपच्या पदाधिकारी यांनी केळी विम्यासाठी पाठपुरावा केला नाही. काहींनी एखादी भेट घेवून चर्चा केली, मात्र त्यांचे फलित काही दिसले नाही.आम्ही निकष बदलवण्यासाठी बैठका आणि चर्चा करत असतांना,यात कोणी भाजपचे लोकप्रतिनिधी आले नाहीत .आता विम्याची मुदत झाल्यावर याविषयावर हीन पातळीवर राजकारण केले जात आहे.मात्र शेतकऱ्यांच्या बाबतीत असे गलिच्छ राजकारण करू नये.त्यांना शेतकरी कधी माफ करणार नाही. माजी मंत्री असलेले गिरीश महाजन यांनी केलेले स्टेटमेंट त्यांना शोभत नाही.ते सत्तेत असताना जेष्ठ पदावर होते .त्यांच्या काळात शेतकर्यांना कापसासह इतर पिकांना भाव मिळवून दिला का? हे तरी त्यांनी सांगावे.

केळी पिक विम्याच्या मुद्द्यावर माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला असतांना,केळी बेल्टचे आमदार शिरीष चौधरी मात्र सरकारची ढाल बनून त्यांना उत्तर देत आहेत

केंद्र सरकार कडून कोणतीच भूमिका न बदलल्याने केळी विम्याचे निकष तेच राहिले.केंद्र सरकार अनेक जबाबदाऱ्या झटकत आहे.त्यासाठी कॉंग्रेस पक्ष सातत्याने भूमिका मांडून त्यांचा खरा चेहरा समोर आणत असल्याचे आ.चौधरी यांनी यावेळी सांगितले.

Protected Content