संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर झाल्याने भाजपचा फटाके फोडून आनंदोत्सव साजरा

जळगाव प्रतिनिधी । राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी नुकताच मंजूर केला. त्यामुळे शुक्रवारी दुपारी जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य शासन तसेच संजय राठोड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर शिवसेनेचे नेते तथा राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला होता. राज्यपालांनी हा राजीनामा नुकताच मंजूर केला आहे. त्यामुळे जळगावात भाजपच्या वतीने फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी महापौर भारती सोनवणे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेवक कैलास सोनवणे, प्रदीप रोटे, महेश जोशी, माजी नगरसेवक राजेंद्र मराठे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना महापौर भारती सोनवणे यांनी सांगितले की, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपने पाठपुरावा करत तिला न्याय मिळावा, ही भूमिका घेतली. म्हणूनच संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला आहे. पूजा चव्हाणला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत भाजपकडून या प्रकरणात पाठपुरावा सुरूच राहील, असेही महापौर सोनवणे यांनी सांगितले.

Protected Content