
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेळेवर उपस्थितीबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर दीपमाला मनोज काळे यांनी प्रशासनाला कठोर निर्देश दिले आहेत. महापालिकेतील सर्व विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत नियमित उपस्थित राहून नागरिकांची कामे तत्परतेने मार्गी लावावीत, असे आदेश त्यांनी आयुक्तांना दिले आहेत.

महापौर दीपमाला काळे यांनी यासंदर्भात आयुक्तांना लेखी पत्र पाठविले आहे. या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, जळगाव शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून शहराची लोकसंख्या तसेच उपनगरांमधील रहिवासी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. परिणामी महापालिकेच्या विविध विभागांमध्ये नागरिकांची वर्दळ वाढली असून अनेक कामांसाठी नागरिकांना महापालिकेच्या कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत.
महापौरांनी पत्रात स्पष्ट केले आहे की, नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात अशा तक्रारी प्राप्त होत आहेत की काही अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयीन वेळेत आपल्या जागेवर उपलब्ध नसतात. अनेकदा कार्यालयात भेट देणाऱ्या नागरिकांना संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी सापडत नसल्याने त्यांची कामे रखडतात. विशेषतः कार्यालयीन वेळेत वैयक्तिक कारणांसाठी बाहेर जाणे, चहापानासाठी अथवा इतर कारणांमुळे दीर्घकाळ अनुपस्थित राहणे यामुळे नागरिकांना अनावश्यक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
पत्रात पुढे नमूद करण्यात आले आहे की, महापालिकेच्या कामकाजात शिस्त आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे. नागरिकांच्या समस्या आणि प्रलंबित कामांचा निपटारा वेळेत होण्यासाठी अधिकारी वर्गाने आपल्या कर्तव्यांप्रती अधिक जबाबदारीने वागणे आवश्यक असल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले आहे.
महापौरांनी मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांना निर्देश देताना सांगितले आहे की, महानगरपालिकेतील सर्व विभागप्रमुख आणि शाखा अधिकाऱ्यांना याबाबत योग्य त्या सूचना देण्यात याव्यात. कार्यालयीन वेळेत प्रत्येक अधिकारी व कर्मचारी आपल्या कार्यस्थळी उपस्थित राहील याची खात्री करावी. अत्यावश्यक कारणाशिवाय कार्यालय सोडू नये तसेच नागरिकांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याबाबतही आवश्यक कार्यवाही करावी, असे त्यांनी आदेशित केले आहे.
महापालिकेतील कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे नागरी सुविधांशी संबंधित कामांचा भार वाढत असताना अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत शिस्त राखण्याचा संदेश या आदेशातून देण्यात आला आहे.



