खांजोडवाडीतून दरवर्षी सुमारे दोन हजार टन डाळिंबांची युरोपला निर्यात

 

सांगली: वृत्तसंस्था । २५ वर्षांपूर्वी ऊसतोडीसाठी जाणाऱ्या खांजोडवाडीतून आता दरवर्षी सुमारे दोन हजार टन डाळिंबांची युरोपला निर्यात होते. अतिवृष्टी आणि रोगांचा प्रादुर्भाव असूनही या गावातील ९५ टक्के डाळिंब बागा निर्यातक्षम आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज खांजोडवाडीत जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत प्रयोगशीलतेचे कौतुक केले.

आटपाडीपासून पाच किलोमीटर अंतरावरील खांजोडवाडी म्हणजे दुष्काळ पाचवीला पुजलेले गाव होते. कधी चांगला पाऊस पडला तर ज्वारी, बाजरी आणि कापूस पिकत होता. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी संपूर्ण गाव ऊसतोडीसाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्याच्या साखर पट्ट्यात जात होते. १९९५ मध्ये टेंभू योजनेचे पाणी आले अन् गावाचे भाग्यच बदलले.

काही शेतकऱ्यांनी डाळिंबाची रोपे लावली आणि दोन वर्षात खांजोडवाडीच्या दर्जेदार डाळिंबांनी आटपाडीच्या बाजारपेठेत नावलौकिक मिळवला. यानंतर दीडशे कुटुंबांच्या खांजोडवाडीने डाळिंब शेतीमध्ये विविध प्रयोग करीत आपला दबदबा निर्माण केला. गेल्या दहा वर्षांपासून सलग या एकाच गावातून सुमारे दोन हजार टन डाळिंबांची युरोपीय देशांमध्ये निर्यात होते. निर्यातीसाठी मागणी वाढत असल्याने खांजोडवाडीची वार्षिक उलाढाल १० ते १२ कोटींवर पोहोचली आहे.

खांजोडवाडीची लोकसंख्या ९६० एवढी आहे. एकूण ३२० हेक्टरपैकी २०० हेक्टरवर डाळिंबाच्या बागा आहेत. सेंद्रीय खतांचा वापर आणि पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यात या गावातील शेतकऱ्यांना यश आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हवामानाचा योग्य अंदाज घेऊन अतिवृष्टी, गारपीट अशा नैसर्गिक संकटांपासून बागांचे संरक्षण केले जाते. गावातील १५-२० शेतकऱ्यांचे पथक दर १५ दिवसांनी शिवार भेटीचा उपक्रम राबवते. यातून प्रत्येक शेतकऱ्याला मार्गदर्शन मिळते. बिब्या, तेल्या, करपा अशा रोगांचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी वेळीच दक्षता घेतली जाते. फळांचा आकार, रंग आणि चव उत्तम असल्याने डाळिंबांना चांगला भाव मिळतो. एकूण उत्पादनापैकी ९५ टक्के निर्यातीमुळे शेतकऱ्यांना जादा लाभ मिळतो.

यंदा लॉकडाऊन लागू झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यानंतर अतिवृष्टी आणि रोगांचे प्रमाण वाढल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. या स्थितीत खांजोडवाडीच्या शेतकऱ्यांनी बागा टिकवून ठेवल्या. शेतीचे वेगळेपण पाहण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आमंत्रित केले होते. पवारांनी शुक्रवारी दुपारी खांजोडवाडीत पोहचून डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या प्रयोगांची माहिती घेतली. सेंद्रीय शेती आणि निर्यातीमधील अडचणी जाणून घेतल्या. संकट काळातही बागा टिकवून निर्यातीचे योग्य नियोजन केल्याबद्दल त्यांनी शेतकऱ्यांचे कौतुक केले. खांजोडवाडीचा आदर्श घेऊन इतर गावांनीही शेतीत आवश्यक बदल करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Protected Content