खडसे हा विषय आता भाजपसाठी संपलेला आहे

मुंबई : वृत्तसंस्था । खडसे हे आमचे नेते होते. त्यांनी पक्ष सोडल्याचं दु:ख आहेच, त्यांच्या पक्षांतराचा फारसा परिणाम होणार नाही. खडसेंसोबत एकही आमदार वा पदाधिकारी जाणार नाही. खडसे हा विषय आता भाजपसाठी संपलेला आहे,’ असं रावसाहेब दानवे म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते

‘एकनाथ खडसे यांना प्रदेशाध्यक्षपदाची ऑफर दिली होती. मात्र, त्यांनी ती नाकारली. त्यांच्या जागी देवेंद्र फडणवीसांना संधी मिळाली आणि पुढं ते मुख्यमंत्री झाले. खडसे यांनी तेव्हाच प्रदेशाध्यक्षपद घेतले असते तर कदाचित ते मुख्यमंत्री झाले असते,’ असा दावा भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. भाजपच्या नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. रावसाहेब दानवे यांनी खडसेंच्या बाबतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हा त्या पदासाठी खडसेंना विचारण्यात आलं होतं. तब्येतीचं कारण सांगून त्यांनी ते पद नाकारलं. त्यांना प्रदेशाध्यक्ष पदापेक्षा मंत्रिपदात अधिक रस होता,’ असं दानवे म्हणाले.

पक्ष सोडू नये म्हणून मला फक्त चंद्रकांत पाटील यांनी फोन केला होता, असं खडसे म्हणाले होते. त्यावर दानवे म्हणाले, ‘मी खडसेंच्या फार्महाउसवर गेलो होतो. घरी आणि सरकारी बंगल्यावरही गेलो होतो. मी त्यांना समजावलं नाही पण राजकारणावर चर्चा झाली. मतभेदांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला होता, २०१९ च्या निवडणुकीपूर्वी भाजपनं राष्ट्रवादीचं नुकसान केलं होतं. ते भरून काढण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. त्यातूनच खडसेंना प्रवेश देण्यात आला असावा, ‘राष्ट्रवादीनं खडसेंचा वापर राज्याच्या भल्यासाठी करावा, विरोधकांसाठी करू नये,’ अशी अपेक्षाही दानवे यांनी व्यक्त केली.

Protected Content