लोक जनशक्ती पक्षाबाबत भूमिकेची उत्सुकता

 

पाटणा: वृत्तसंस्था । पंतप्रधान मोदी आज बिहार निवडणूक प्रचाराच्या सासाराम, गया आणि भागलपूर येथे तीन सभांना संबोधित करतील. पंतप्रधानांसोबत बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार असतील. मात्र, पंतप्रधान मोदी लोक जनशक्ती पक्षाबाबत काय बोलतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

एलजेपीचे नेते चिराग पासवान बिहार निवडणुकीच्या या संग्रामात पंतप्रधान मोदींच्या नावाने आणि नीतीश कुमार यांच्या विरोधात मते मागत आहेत.

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएमध्ये मनाप्रमाणे जागा न मिळाल्याने एलजेपी स्वतंत्र निवडणूक लढवत आहे. चिराग पासवान यांनी जनता दल संयुक्तच्या विरोधात सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. ते नीतीश कुमार यांच्यावर सतत हल्लाबोल करत आहेत. जागा वाटपामध्ये ज्या भाजप नेत्यांच्या जागा जनता दल संयुक्तच्या वाट्याला आल्या, त्या जागांवर चिराग पासवान यांनी त्या भाजप नेत्यांना त्या-त्या जागांवर पक्षाकडून उमेदवारी दिली आहे. अशा प्रकारे संयुक्त जनता दलाचे १५ बंडखोर उमेदवार देखील निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

मात्र, भारतीय जनता पक्ष आणि जनता दल संयुक्तने बंडखोर नेत्यांना पक्षाच्या बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या व्यतिरिक्त पक्षात अंतर्गत बंडाळी उफाळून येण्याचा धोका देखील निर्माण झालेला आहे. भारतीय जनता पक्षाचे सर्व बंडखोर नेते हे मोदी यांच्या कामावरच मते मागत आहेत एलजेपी प्रमुख चिराग पासवान सतत नीतीश कुमार यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. भारतीय जनता पक्षावर मात्र ते नरमाईने वागत आहेत. चिराग स्वत:ला मोदींचा हनुमान मानत आहेत.

गेल्या वेळेला लालूप्रसाद यादव यांच्या आशीर्वादाने नीतीश कुमार मुख्यमंत्री बनले आणि त्यांचाच विश्वासघात करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने एका रात्रीत मुख्यमंत्री बनले. या वेळी नरेंद्र मोदीचा आशीर्वाद घेऊन ते पुन्हा लालूप्रसाद यादव यांना शरण जाऊ नयेत म्हणजे झाले, अशा शब्दांत चिराग पासवान यांनी नीतीश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Protected Content