गणेश विसर्जनानंतर राज्य सरकारचे विसर्जन होणार- आठवले

मुंबई प्रतिनिधी । अंतर्गत बंडाळीमुळे महाविकास आघाडी सरकारचे श्रीगणेश विसर्जनानंतर विसर्जन होईल असं प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. ते आज येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

आज आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले यांनी महाविकास आघाडी सरकारचे काही खरे नसल्याचे भाकीत केले. ते म्हणाले की, मुंबई पोलिसांचा जगात नावलौकिक आहे. त्यातुलनेत सुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास वेगवान झालेला नाही. त्यामुळे पार्थ पवार यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची केलेली मागणी रास्त आहे. यापूर्वीही अनेक प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. त्याचा अर्थ आमचा मुंबई पोलिसांवर विश्‍वास नाही असा होत नाही. मुंबई पोलिसांवर आमचा विश्‍वास आहे. पण एखादे प्रकरण सीबीआय चौकशीसाठी द्यावे ही मागणी करणे म्हणजे मुंबई पोलिसांवर अविश्‍वास दाखविणे असा होत नाही. त्यामुळे सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी ही आमची मागणी असल्याचं आठवलेंनी सांगितले.

आठवले पुढे म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षात अंतर्गत वाद आहेत. पार्थ पवारबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार ही नाराज झाले आहेत. तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकारचे लवकरच विसर्जन होईल. गणेश विसर्जन झाल्यानंतर सरकार पडेल अशी शक्यता निर्माण झाल्याने महाविकास आघाडीच्या कंपूत अस्वस्थता आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार पडण्याआधी केंद्र सरकार पडेल असे विधान केले. यावर ते म्हणाले की, सामना वृत्तपत्र चालविणे सोपे आहे मात्र नरेंद्र मोदींशी सामना करणे त्यांना जमणार नाही. केंद्रातील मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार मजबूत बहुमत असणारे सरकार आहे. या सरकारला २०२४ पर्यंत धोका नाही तसेच २०२४ च्या ही निवडणुका मोदी सरकार जिंकेल असा विश्‍वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

Protected Content