कोरोना : सावखेडा प्रा.आ.केंद्रात गैरहजर राहणारे दोन वैद्यकीय अधिकारी निलंबित

यावल प्रतिनिधी । कोरूना विषाणू संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील डॉक्टर व आरोग्य विभागात राज्य शासनाने अति दक्ष राहण्याचे आदेश दिले असताना तालुक्यातील सावखेडा सिम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे दोघेही वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याचे आढळून आल्याने जि.प.शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र पाटील यांनी या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निलंबनाचे आदेश काढले.

यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, सध्या संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिक चांगलेच धास्तावले असून या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शासनाने नागरिकांच्या आरोग्य सेवेत कुठेही दुर्लक्ष होऊ नये, या दृष्टिकोनातून सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना ग्रामीण रुग्णालय उपप्राथमिक केंद्र व प्राथमिक केंद्र न सोडण्याचे आदेश दिले असताना यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गौरव भोईटे, डॉ. नजमा तडवी हे दोघे वैद्यकीय अधिकारी रविवार १२ एप्रिल रोजी शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र पाटील यांनी कोरूना विषाणूच्या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांची भेट घेऊन याविषयी सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे दोघेही वैद्यकीय अधिकारी गैरहजर आढळून आल्याने शिक्षण सभापती रवींद्र पाटील यांनी या दोघेही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबनाचे आदेश दिल्याचे वृत्त आहे. दरम्यान ३ कोटी रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी याठिकाणी कर्मचाऱ्यांकवीता नवीन निवासस्थान बांधण्याचे काम सुरू असून याठिकाणी आरोग्य केंद्राचा कुठलाही जबाबदार व्यक्ती हजर नसल्याने संबंधित ठेकेदार अत्यंत निकृष्ट साहित्य वापरून निवासाचे बांधकाम करीत असल्याचे दिसून आल्याने सभापती रवींद्र पाटील यांनी सुरू असलेले काम तात्काळ बंद पाडले असून आपण याबाबत देखील चौकशी करून ठेकेदारावर कार्यवाही करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहे.

एका लोकप्रतिनिधीच्या गावात अतिमहत्त्वाच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचे काम निकृष्ट प्रतीचे होत असताना कोणीही या ठिकाणी बोलण्यास तयार नाही ही फार मोठी शोकांतिका असल्याची भावना पाटील यांनी व्यक्त केली. कोरोना सारख्या अत्यंत घातक अशा आजाराच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील विशेषतः आदिवासी क्षेत्रातील वैद्यकीय अधिकारी रुग्णांच्या उपचार करण्याऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्र गैरहजर राहत असल्याने सभापती पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

Protected Content