यावल येथे शांतता समितीच्या बैठकीत पोलिसांनी केले सलोख्याचे आवाहन

peace symbol

यावल, प्रतिनिधी | धार्मिक व सार्वजनिक उत्सवाप्रसंगी अति उत्साहीत न होता सामाजीक सलोख्याचे भान ठेवुन सण साजरे करा, उत्साहाच्या भरात काही गैरकृत्य करून गुन्हा दाखल होण्याची नसती आफत ओढवून घेऊ नका, कायदा सुव्यस्था व शिस्तीचे पालन करून सर्व समाजातील नागरिकांनी आपले सण-उत्सव साजरा करा, असे आवाहन फैजपुर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी यावल पोलिस ठाण्याच्या आवारात शुक्रवारी आयोजित शांतता समितीच्या बैठकीत केले.

 

 

गणेशोत्सव, मोहरमनिमित साजरे होणारे पहेरहन शरीफच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी शुक्रवारी सायंकाळी शांतता समितीची बैठक बोलावली होती. या अतिमहत्वाच्या शांतता समितीच्या बैठकीस शहर व तालुक्यातील गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते व मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती. बैठकीत विभागीय पोलीस अधिकारी नरेन्द्र पिंगळे यांनी, गणेशोत्सव साजरा करत असताना प्रत्येक मंडळाने उंच मूर्तीचा आग्रह धरू नये. कारण उंच मूर्ती विसर्जनप्रसंगी तिला पुलावरून नदीपात्रात टाकले जाते, हा प्रकार अयोग्य वाटतो. विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, अशा सुचना देवून मार्गदर्शन केले.

काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व शांतता समितीचे जेष्ठ सदस्य हाजी शब्बीर खान यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना कोल्हापुर, सांगली, सातारा येथील पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहन केले. बैठकीला नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख मुन्ना पाटील, शरद कोळी, वीज वितरण कंपनीचे दिलीप मराठे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, नगरसेवक अभिमन्यू चौधरी, शिवसेनेचे संतोष खर्चे, दीपक सराफ, भुषण फेगडे, ज्ञानेश्वर महाजन, आकाश कोळी यांच्यासह तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Protected Content