जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या कालावधीत अवैधरित्या मद्य विक्री करण्याचे आढळून आल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी नशिराबाद येथील कामदार ट्रेडर्स या दुकानाचा होलसेल देशी दारू विक्रीचा परवाना रद्द केला आहे.
लॉकडाऊनच्या काळात अनेक दारू दुकानांमधून अवैध विक्री होत असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी केली होती. त्यांनी सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा केला. या अनुषंगाने झालेल्या कारवाईनंतर शहरातील क्रिश वाईन्स व नीलम वाईन्ससह अनेक दुकानांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. यात आता नशिराबाद येथील कामदार ट्रेडर्स या देशी दारूची होलसेल विक्री करणार्या दुकानाचा परवाना रद्द केला आहे. याची मालकी देखील राजकुमार शीतलदास नोतवानी यांची आहे. नोतवानी यांचीच मालकी असणारे जळगावचे आर.के. वाईन्स, नशिराबादचे क्रिश ट्रेडर्स, चाळीसगावचे क्रिश ट्रेडर्स यांचे परवाना अलीकडेच कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. तर नोतवानी यांची भागिदारी असणारे हॉटेल पांचाली आणि सोनी ट्रेडर्स यांचे परवाने देखील रद्द झालेले आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप यांनी कामदार ट्रेडर्सचा परवाना रद्द करण्याचे आदेश काढले आहेत. तर आधी चौकशी करण्यात आलेल्या काही दुकानांचे परवाने देखील रद्द होणार असून याबाबत लवकरच आदेश निघू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.