पहूर कसबेच्या मृत तरूणाचा कोरोना अहवाल निगेटीव्ह

पहूर ,ता.जामनेर रविंद्र लाठे । मागील आठवडयात जळगावच्या कोवीड रुग्णालयात मृत्यू झालेल्या पहूरच्या ‘त्या’ तरुणाचा स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने परिसरातील जनतेसह आरोग्य यंत्रणांनी सुटकेचा श्‍वास सोडला आहे.

याबाबत माहिती अशी की, श्‍वासाच्या त्रासामुळे पहूर कसबे येथील ३८ वर्षीय तरुणाचा जळगाव येथील जिल्हा कोवीड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मात्र त्याचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती पहूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.हर्षल चांदा यांनी दिली आहे. यामुळे गावकर्‍यांनी सुटकेचा निस्वास सोडला आहे. तरीही जनतेने काळजी घेण्याची गरज आहे.

दरम्यान, पोटदूखीमुळे त्या तरूणाने गावातच खासगी दवाखान्यात दोन दिवस उपचार घेतले.नंतर श्‍वासाचा त्रास सुरू झाल्यावर ग्रामिण रूग्णालयात नेण्यात आले. वैद्यकिय अधिकार्‍यांनी जळगांवला नेण्याचा सल्ला दिला.त्याच्यावर डॉ. उल्हास पाटील हॉस्पीटलमध्ये नेल्यावर व्हेंटीलेटर नसल्याचे कारण सांगत त्याला कोविड रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पहूर ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर होवून दिड वर्ष उलटले आहे . मात्र येथे अजूनही फारश्या सुविधा नाहीत . आरोग्य प्रशासनाने पहूरला मुलभूत वैदयकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची नितांत गरज आहे.

Protected Content